नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यांनीच मला फोन करून त्याबद्दल माहिती दिली आणि शनिवारी दुपारी तातडीने बैठक बोलावल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.
नेपाळसह उत्तर भारतात शनिवारी बसलेले भूकंपाचे धक्के आणि केंद्र सरकारकडून करण्यात येणारी मदत याबद्दल राजनाथसिंह यांनी लोकसभेत निवेदन सादर केले. त्यावेळी ते म्हणाले, मी आणि पंतप्रधान दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात होतो. हा कार्यक्रम संपल्यावर परतत असताना मला मोदींचा फोन आला आणि त्यांनी नेपाळसह उत्तर भारतात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांबद्दल माहिती दिली. गृहमंत्री असूनही माझ्याआधी त्यांच्याकडे याबद्दल माहिती होती. मी टीव्ही सुरू केल्यावर मला घटनेची तीव्रता लक्षात आली. मोदींनी लगेचच दुपारी तीन वाजता बैठक बोलावली होती. त्याच दिवशी त्यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्या राज्यातील परिस्थितीची माहिती करून घेतली. मी सुद्धा तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्याकडून परिस्थितीबद्दल माहिती घेतली, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
भारत नेपाळला आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे सांगून ते म्हणाले, भारतात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकार आर्थिक मदत करणार आहे. त्याचबरोबर जखमींवर उपचारांसाठी केंद्र सरकार मदत करेल.

Story img Loader