महाराष्ट्र सदनामध्ये शिवसेनेच्या खासदारांनी आयआरसीटीसीच्या कर्मचाऱयाचा ‘रोजा’ मोडल्याचा आरोप करण्यात येत असताना, अद्याप याप्रकरणी पोलीसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. महाराष्ट्र सदनात गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेबद्दल महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीवर आधारित निवेदन राजनाथसिंह यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडले.
आयआरसीटीसीचा कर्मचारी अर्शद झुबेर याचा रोजा मोडल्याचा आरोप शिवसेना खासदारांवर करण्यात येतो आहे. या प्रकरणावरून संसदेमध्येही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे काही खासदार हमरीतुमरीवर आले होते. मात्र, केंद्र सरकारकडून ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आणि खेदजनक घटना असल्याचे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. देशातील सर्व नागरिकांचे धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.
ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या काही खासदारांनी १७ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आयआरसीटीसीद्वारे पुरविल्या जाणारय़ा जेवणाच्या गुणवत्तेबाबत तक्रार केली. आयआरसीटीसीचे कंत्राट तात्काळ रद्द करण्याची मागणीही करण्यात आली. महाराष्ट्र सरकारकडून असेही सांगण्यात आले आहे की, खासदारांनी निवासी आयुक्तांच्या कार्यालयात आणि स्वयंपाकघरात जाऊन आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी आयआरसीटीसीचे व्यवस्थापक अर्शद झुबेर यांना जेवणाच्या गुणवत्तेवरून कथित जबरदस्ती करीत पोळी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आयआरसीटीसीने १८ जुलै रोजी पत्र लिहून महाराष्ट्र सदनातील सेवा करार समाप्त करीत असल्याचे कळविले. हा निर्णय बदलला जाणार नाही, असेही पत्रात लिहिले आहे. दरम्यान, या प्रकाराविरोधात अर्शद झुबेर यांनी स्थानिक पोलीसांकडे तक्रार केलेली नाही. मात्र, निवासी आयुक्तांनी मुख्य सचिव व राज्य सरकारला या प्रकाराची माहिती दिली. सरकारनेही याबाबत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
‘रोजा’ मोडल्याच्या आरोपाप्रकरणी अद्याप पोलीसांकडे तक्रार नाही – राजनाथसिंह
महाराष्ट्र सदनात गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेबद्दल महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीवर आधारित निवेदन राजनाथसिंह यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडले.
First published on: 25-07-2014 at 03:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh statement on maharashtra sadan incident