Tulsi Gabbard in India: अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड सध्या भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली. अमेरिकेच्या भूमीवर खलिस्तानवादी संघटना ‘शीख फॉर जस्टीस’ (SFJ) या संघटनेच्या भारतविरोधी कारवायांबाबत चिंता व्यक्त करत खलिस्तानवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी राजनाथ सिंह यांनी केली. ‘शीख फॉर जस्टीस’ या संघटनेवर भारतात बंदी घातलेली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकेच्या भूमीवर भारत विरोधी कारवाया सुरू असून त्याबद्दल भारताने चिंता व्यक्त करत अमेरिकन प्रशासनाने बेकायदेशीर संघटनावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. तुलसी गॅबार्ड आणि राजनाथ सिंह यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान संरक्षण क्षेत्राला बळकटी आणि सुरक्षा या विषयांवर चर्चा झाली. या क्षेत्रासाठी दोन्ही देश परस्परांना सहकार्य करणार असल्याचे समजते.
सदर बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या संचालक तुलगी गॅबार्ड यांना भेटून आनंद झाला. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान संरक्षण आणि माहितीची देवाणघेवाण यासंबंधी विषयावर मुद्देसूद चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय सुलक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काल गॅबार्ड यांची भेट घेतल्यानंतर आज राजनाथ सिंह आणि गॅबार्ड यांच्यात बैठक पार पडली.
Happy to have met the US Director of National Intelligence Ms @TulsiGabbard in New Delhi. We discussed a wide range of issues which include defence and information sharing, aiming to further deepen the India-US partnership. pic.twitter.com/DTUgJIgeCN
— Rajnath Singh (@rajnathsingh) March 17, 2025
मागच्या वर्षी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याबद्दल भारतीय नागरिक निखील गुप्ता विरोधात अमेरिकेने कारवाई केली होती. तसेच भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यालाही सहआरोपी केले होते. नोव्हेंबरमध्ये घडलेल्या या घडामोडीनंतर ही बैठक झाली आहे, त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले की, गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट भारतीय नागरिकाने रचला होता. हा व्यक्ती भारतीय गुप्तचर संस्थेचा एजंट असल्याचे समोर आले होते. या व्यक्तीने एका मारेकऱ्याला हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप ठेवला गेला होता. भारताने मात्र पन्नू याच्या हत्येत सहभाग असल्याचे आरोप फेटाळून लावले होते.
शीख फॉर जस्टीस म्हणजे काय?
वेगळ्या खलिस्तान राष्ट्राची मागणी करण्यासाठी शीख फॉर जस्टीस या संघटनेची स्थापना अमेरिकेत करण्यात आली होती. २००७ साली गुरपतवंत सिंग पन्नू याने या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या माध्यमातून भारताचे विभाजन करण्याबाबतचा विचार पन्नू पसरवत होता.
दहशतवाद आणि कट्टरपंथी कारवाया करत असल्यामुळे भारत सरकारने २०१९ साली या संघटनेवर बंदी आणली होती. या संघटनेला पाकिस्तानमधील आयएसआय सारख्या भारतविरोधी संघटनांचा पाठिंबा होता.