नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून या पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळालं आहे. भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये जिंकली आहेत. तर तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेसने तेलंगणात सत्तास्थापन केली असून रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी मात्र अद्याप तीनपैकी एकाही राज्यात सत्तास्थापन करू शकलेली नाही. भाजपा अद्याप त्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित करू शकलेली नाही. मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे, सरोज पांडेय यांना राजस्थानचे पर्यवेक्षक म्हणून नेमलं आहे. तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, के. लक्ष्मण आणि आशा लकडा यांना मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. तर अर्जुन मुंडा, सर्वानंद सोनेवाल, दुष्यंत गौतम यांची छत्तीसगडचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पर्यवेक्षक आमदारांची बैठक घेतील. या बैठकीत सर्व आमदारांचं मत जाणून घेतील. त्यानंतर भाजपा हायकमांडच्या मंजुरीनंतर रविवारपर्यंत अंतिम निर्णय घेतील. रविवारीच मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली जाऊ शकते.

मुख्यमंत्री निवडीबाबत भाजपामध्ये खलबतं चालू आहेत. तसेच विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या भाजपाच्या ११ खासदारांनी लोकसभेचा राजीनामा दिला आहे. या खासदारांपैकी काही नेते तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

हे ही वाचा >> रेवंत रेड्डी यांचा शपथविधी; व्यासपीठावर ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती, लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर समर्थकांची गर्दी

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणारे नेते

राजस्थान : वसुंधराराजे सिंधिया, दिया कुमारी, ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत, बाबा बालकनाथ
मध्य प्रदेश : शिवराज सिंह चौहान, प्रह्लाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलास विजयवर्गीय आणि ज्योतिरादित्य सिंधिया
छत्तीसगड : रमन सिंह, भाजपा प्रदेशाध्यक्ष अरूण साव, रेणुका सिंह आणि ओ. पी. चौधरी

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh vinod tawde appointed as observers to pick rajasthan cm by bjp asc
Show comments