सहिष्णुता आपल्या संस्कृतीतच आहे. पण सध्या असहिष्णुतेच्या वातावरणाचा बनाव रचून सरकारला बदनाम करण्याचा कट रचला जातो आहे, असे उत्तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये असहिष्णुतेवरील चर्चेला दिले. देशातील सामाजिक आणि धार्मिक समरसता कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला माफ केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेमध्ये नियम १९३ अंतर्गत देशातील वाढत्या असहिष्णुतेवर चर्चा घडवून आणण्यात आली. विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. राजनाथ सिंह यांनी सरकारच्या वतीने चर्चेला उत्तर दिले. ते म्हणाले, जगात सर्वाधिक सहिष्णुता भारतातच आहे. वसुधैव कुटुंबकम हा संदेश जगाला भारतातूनच देण्यात आला होता. सहिष्णुता आमच्या संस्कृतीतच आहे. ज्ञानी विचारांचा गौरव करण्याची कायम आपली परंपरा राहिली आहे. कोणाच्याही दबावामुळे आम्ही सहिष्णू नसून, ती आमची परंपराच आहे.
उत्तर प्रदेशातील दादरी प्रकरणामध्ये तेथील सरकारने दिलेल्या अहवालात ही घटना जातीय हिंसाचारातून किंवा गोमांस ठेवल्याच्या मुद्द्यावरून घडली नसल्याची म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणून मी राज्य सरकारकडून आलेल्या अहवालाच्या आधारेच बोलणार असे सांगून राजनाथ सिंह यांनी या प्रकरणी राज्य सरकारने मागणी केल्यास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून तपास करण्यास आम्ही तयार आहेत, असे स्पष्ट केले.
देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे का, असा प्रश्न उपस्थित करून यापूर्वी घडलेल्या घटनांवर तत्कालिन पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या का, असे त्यांनी विचारले. गृह विभागाशी संबंधित विषयावर मी स्वतः प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी आणि सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी कोणतेही विधान करताना विचार केला पाहिजे, हे मी यापूर्वीच सांगितले आहे. आपल्या विधानांमुळे कोणताही गैरसमज होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असेही आम्ही सर्वांना सांगितले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकूण ३९ जणांनी आतापर्यंत केंद्र सरकारचे पुरस्कार परत केले आहेत. त्यापैकी काही साहित्यिकांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एक पत्रक प्रसिद्ध करून नरेंद्र मोदींना फॅसिस्ट म्हणून संबोधले होते. नरेंद्र मोदींनी देशाचे नेतृत्त्व करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. पण जनमताने मोदींनाच नेतृत्त्व करण्याची संधी दिली. आता जनमताचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पुरस्कार परत केलेल्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असेही आवाहनही राजनाथ सिंह यांनी केले.
दरम्यान, गृहमंत्री देशातील घटनांवर न बोलता परदेशातीलच उदाहरणे देत आहेत, असे सांगत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी राजनाथ सिंह यांचे भाषण सुरू असतानाच सभात्याग केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा