पक्षाचा अध्यक्ष असलो तरी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट करतानाच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आला, तर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनतील, असे अप्रत्यक्ष संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे दिले. त्याचवेळी राममंदिरापेक्षाही विकास हा निवडणुकीतील भाजपसाठीचा महत्त्वाचा मुद्दा असेल, असे ते म्हणाले.
निवडणुकांच्या सात महिने अगोदर आपण गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नेमले, त्यात गैर काय होते, इतर पक्ष करतात तसेच आम्ही प्रचार समिती प्रमुख म्हणून मोदींना नेमले त्यात त्यातून वेगळे अर्थ कशाला काढता, असा सवाल राजनाथ यांनी केला. त्याचवेळी निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर आल्यास मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे सर्वतोपरी सूचित करताना राजनाथ सिंग म्हणाले, की मोदी यांची लोकप्रियता जास्त आहे व ते सध्या देशातील उत्तुंग नेते आहेत. ते गुजरातमध्येच नव्हे तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार म्हणजे उत्तरकेडून दक्षिणेकडे व पूर्वेकडून पश्चिमेकडे त्यांची लोकप्रियता आहे व त्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत होईल.
पक्षाध्यक्षांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित न करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की प्रत्येक वेळी पक्षाध्यक्षाला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले जातेच असे नाही. भाजपला पुन्हा सत्तेवर आणणे व काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीपासून देशाला मुक्त करणे हे आपल्या पक्षाध्यक्ष काळातील प्रमुख काम आहे.
निवडणूक आश्वासनांबाबत विचारले असता ते म्हणाले की, भाजप रामजन्मभूमीऐवजी विकासाच्या मुद्दय़ावर जास्त भर देईल. राम मंदिर हा निवडणुकीतल प्रमुख मुद्दा नाही, तो एक राष्ट्रीय प्रश्न आहे पण निवडणूक मुद्दा नाही.