काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दीर्घ सुट्टी संपण्यापूर्वी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांच्या नावांची घोषणा केली. महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्या रजनी पाटील व खा. राजीव सातव यांना प्रवक्त्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. तर खा. हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, राजीव सातव, आमदार प्रणीती शिंदे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, अमित देशमुख, अनंत गाडगीळ यांची वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होण्यासाठी असलेल्या माध्यम मंडळात (पॅनल) वर्णी लागली आहे. युवा नेत्यांना प्रवक्ते नेमून पक्षनेतृत्वाने सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल यांच्या अनुपस्थितीत अनेक महत्त्वाच्या नियुक्त्यांनंतर प्रवक्ते नेमण्यात आले आहेत.
खा. दीपेंदर हुडा, गौरव गोगई या नवख्या खासदारांसह माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आरपीएन सिंह, एससी आयोगाचे अध्यक्षा पी. एल. पुनिया यांना प्रवक्ते नेमण्यात आले आहे. प्रादेशिक समतोल साधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिंदी पट्टय़ातील चेहऱ्यांना प्रवक्ते व मीडिया पॅनलमध्ये स्थान दिले आहे. तब्बल १७ जणांना प्रवक्तेपदी नेमण्यात आले आहे, तर मीडिया पॅनलच्या यादीत ३१ जण आहेत. राहुल गांधी सुट्टीवर गेल्यानंतर गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र व मुंबई प्रदेश अध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता पक्षाने प्रसारमाध्यमांमध्ये अधिकृत भूमिका मांडण्यासाठी ५४ जणांची यादी प्रसिद्ध केली आहे.

Story img Loader