सुपरस्टार रजनीकांत हे ‘जेलर’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. देशभरात जेलर चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. अशात रजनीकांत वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करत आहेत. रजनीकांत दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी रजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. दोघांनी एकत्र जेलर चित्रपटही पाहिला आहे.
पण, योगी आदित्यनाथ आणि रजनीकांत यांची भेट वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊ येथे जेलर चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी रजनीकांत शनिवारी ( १९ ऑगस्ट ) पोहचले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी योगी आदित्यनाथ रजनीकांत यांच्या स्वागतासाठी हजर होते. तेव्हा गाडीतून उतरल्यावर रजनीकांत योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले.
रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, आज ( २० ऑगस्ट ) रजनीकांत यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. त्यानंतर रजनीकांत अयोध्येकडे रवाना झाले.
रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाने १० दिवसांत जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर, भारतात २४५ कोटी रुपयांचा गल्ला जेलर चित्रपटाने जमा केला आहे. शनिवारी जेल चित्रपटाने १८ कोटींची कमाई केली होती.