गेल्या वर्षी एकीकडे पंजाबमध्ये काँग्रेसची शकलं पडत असताना दुसरीकडे राजस्थानमध्ये देखील सचिन पायलट विरुद्ध मुख्यमंत्री अशोक गेहलोत अशी उभी फूट काँग्रेसमध्ये पडते की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. राजस्थानमध्ये तसा पायलट विरुद्ध गेहलोत हा वाद बराच जुना आहे. हा वाद इतका टोकाला गेला होता, की सचिन पायलट काँग्रेसचा हात झटकून आपल्या हाती भाजपाचं कमळ घेणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अखेर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दोघांची समजूत काढून हा वाद मिटवला. मात्र, रागाच्या भरात सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मात्र दिला.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा या दोघांनी एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टोलेबाजी केली आहे. आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांचं थेट नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला आहे. काही नेतेमंडळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सन्मानाच्या नावाखाली भडकावत असल्याचं अशोक गेहलोत म्हणाले आहेत.
नेमकं झालं काय?
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जयपूरमधील शहीद स्मारकाजवळ आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमावेळी अशोक गेहलोत यांनी केलेल्या भाषणात सचिन पायलट यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. “आपले काही लोक, काही नेते कार्यकर्त्यांना भडकावण्याचं काम करत आहेत. पक्षात त्यांना मान-सन्मान मिळायला हवा असं काहीतरी सांगत आहेत. आता हा एक प्रकारचा जुमलाच झाला आहे”, असं अशोक गेहलोत आपल्या भाषणात म्हणाले.
“मान-सन्मान म्हणजे काय माहिती आहे का?”
अशोक गेहलोत यांनी यावेळी सचिन पायलट यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना मान सन्मान म्हणजे काय हे तुम्हाला माहिती तरी आहे का? असा खोचक सवाल देखील केला. “तुम्ही कधी कार्यकर्त्यांचा मान-सन्मान केला आहे का? मान-सन्मान म्हणजे काय हे तरी माहिती आहे का तुम्हाला? आम्ही एका साध्या कार्यकर्त्यापासून नेते झालो आहोत. आम्हाला मान-सन्मान मिळाला आहे”, असंही गेहलोत यावेळी म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून आमदार सचिन पायलट हे सातत्याने पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांच्या मान-सन्मानाची, त्यांना आदर मिळायला हवा याची चर्चा करताना दिसत आहेत. त्यावरून अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना सुनावल्याची चर्चा राजस्थानच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, या दोघांमधील या सुंदोपसुंदीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या चिंता मात्र वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.