स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी यासाठी शेतकरी चळवळीची व्याप्ती वाढवणाऱ्या राजू शेट्टींचे कौतुक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. तसेच राष्ट्रीय किसान जनजागृती यात्रेला पाठिंबाही दर्शवला आहे. पाटण्यामध्ये राजू शेट्टी आणि नितीशकुमार यांच्यात बैठक झाली. देशभरात सुरु असलेल्या राष्ट्रीय किसान यात्रेत नितीशकुमार यांनी सहभागी व्हावे यासाठी राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातल्या जनता दल युनायटेडचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील आणि महासचिव अतुल देशमुख हेदेखील राजू शेट्टींसोबत पाटण्यात गेले होते.

देशभरात शेतकऱ्यांची अवस्था गंभीर आहे. अशात शेतकऱ्यांसाठी चळवळ मोठी करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, यासाठी आपण लागेल ते सहकार्य करु, असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर ऑक्टोबर महिन्यात चंपारण्यमध्ये होणाऱ्या सभेला हजर राहण्याचे आश्वासनही दिले आहे. देशातला शेतकरी कर्जाच्या बोजाखाली पिचला आहे, बाजारपेठेत शेतमालाचे दर कोसळले आहेत, स्वामिनाथन यांच्या सूत्राप्रमाणे न मिळणारा हमीभाव या सगळ्यामुळे शेती व्यवसायच धोक्यात आला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तातडीने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचेही मत नितीशकुमार यांनी नोंदवले आहे.

बिहार राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. तसेच बिहार सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या योजनाही चांगल्या आहेत, असे सांगत राजू शेट्टी यांनी नितीशकुमार यांचे आभार मानले आहेत. राजू शेट्टी आणि नितीशकुमार यांच्यात झालेल्या बैठकीत शेतकरी चळवळ देशव्यापी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठक संपल्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राजू शेट्टी यांना सोडण्यासाठी त्यांच्या कारपर्यंत आले होते. राजू शेट्टी यांची भूमिका पटल्यानेच नितीशकुमार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. आता या भेटीचा शेतकरी चळवळीवर कसा परीणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader