आग्रा व अलीगडमध्ये झालेल्या धर्मातरणप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण देण्याच्या मागणीवर विरोधी पक्ष ठाम असल्याने राज्यसभेचा दुसरा दिवसही कामकाजाविना वाया गेला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, जदयू व समाजवादी पक्षाने एकजुटीने केलेली मोदींच्या निवेदनाची मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावली. पंतप्रधानांनी निवेदनादरम्यान ‘घरवापसी’चा निषेध करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या विरोधकांनी कामकाज बंद पाडले. दिवसभरात सलग तीन वेळा सभागृह तहकूब केल्यानंतरही तोडगा निघाला नाही.लोकसभेत शून्य प्रहरात तृणमूल काँग्रेस व केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांच्या शाब्दिक चकमक उडाली. मल्लिकार्जुन खरगे यांनी शून्य प्रहरात महत्त्वाचा मुद्दा मांडल्यानंतर उत्तर देण्यास उभे राहिलेल्या रूडी यांच्यावर तृणमूलच्या सौगत रॉय यांनी टिप्पणी केली.
धर्मातरप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीकी अटकेत
आग्रा: आग्रा येथे १०० जणांचे धर्मातर केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी नंद किशोर वाल्मीकी याला अटक करण्यात आली आहे. त्याने मंगळवारी सकाळी हरी प्रभात पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली.या प्रकरणी ९ डिसेंबरला धर्म जागरण मंच त्यांचा उत्तर प्रदेश संयोजक असलेला वाल्मीकी याच्या विरोधात जबरदस्तीने धर्मातर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप इस्माइल याच्या तक्रारीवरून वाल्मीकीवर ठेवण्यात आला होता. इस्माइल हादेखील धर्मातर झालेल्या व्यक्तींमध्ये होता. वाल्मीकीच्या अटकेसाठी पोलिसांनी ठिकठीकाणी छापे टाकले होते. तसेच त्याचा ठावाठिकाणा देणाऱ्यांना १२ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.