Winter Session Of Parliament : गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दोन आठवड्याच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून गोंधळ घालत आहेत. अशात काल सत्ताधारी व विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधकांबरोबर भेदभाव करतात असा आरोप करत इंडिया आघाडीने त्यांच्याविरोधा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. दरम्यान आजही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. दुसरीकडे लोकसभेतही झालेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

मोदी सरकारमधील मंत्री आक्रमक

दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजेजू यांनी आज इंडिया आघाडीने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावार टीका केली आहे. शेतकऱ्याचा मुलगा देशाचा उपराष्ट्रपती झाला आहे, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. सभापतींच्या प्रतिष्ठेवर जर कोणी हल्ला करत असेल तर तो सहन करणार नसल्याचेही रिजेजू म्हणाले.

दुसरीकडे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनीही राज्यसभेत विरोधकांवर टीका केली. नड्डा म्हणाले, “आमचे खासदार सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस उठवत आहेत. हा देशाच्या संप्रभुतेचा विषय आहे. सभापतींच्या विरोधा अविश्वास प्रस्ताव आणून देशाच्या संप्रभुतेच्या मुद्यावरून नागरिकांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे. त्यांनी कधीच सभापतींचा सन्मान केला नाही.”

विरोधकांकडून अणोख्या पद्धतीने निषेध

आज इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात अणोख्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. यावेळी इंडिया आघाडीच्या खासदारांनी तिरंगा ध्वज आणि गुलाबाचे पुष्प देत भाजपाच्या खासदारांचे स्वागत केले. यावेळी विरोधकांनी भाजपाच्या खासदारांना दोन्ही सभागृहाचे कामकाज कामकाज सुरू ठेवण्याचे आणि अदाणींसह इतर सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, काँग्रेस, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा आणि डाव्या पक्षांचे खासदार तिरंगा आणि गुलाब हातात घेऊन संसदेच्या पायऱ्यांवर उभे होते.

विरोधकांकडून मणिपूरचा मुद्दा

आज लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “मणिपूरमध्ये जे काही घडत आहे त्यामुळे लोक त्रस्त आहेत, त्यांना मूलभूत सेवा मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला कधी भेट देणार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय पाऊले उचलणार आहेत याची सभागृहात माहिती द्यावी.” सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपा जॉर्ज सोरोसचा मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Story img Loader