नरेंद्र मोदींचे विश्वासू साथीदार आणि २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणारे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात २५ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. स्थावर आणि जंगम मालमत्ता एकत्रित केल्यास त्यांच्या संपत्तीमध्ये तब्बल ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते.
गुजरातमधून राज्यसभेसाठी अमित शहा, स्मृती इराणी, बलवंतसिंह राजपूत आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार शहा दाम्पत्याच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले. शहा दाम्पत्याकडे २०१२ मध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून ८ कोटी ५४ लाख रुपयांची संपत्ती होती. २०१७ मध्ये ती ३४ कोटी ३१ लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये जंगल मालमत्ता १ कोटी ९१ लाख रुपयांवरुन १९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. शहा दाम्पत्याच्या मालमत्तेमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. शहा यांनी वार्षिक उत्पन्न १ कोटी ४९ लाख रुपये दाखवले आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये मातोश्रींच्या निधनानंतर अमित शहा यांना वारसा हक्काने संपत्ती मिळाली होती. म्हणूनच ही वाढ दिसते असे सूत्रांचे म्हणणे आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील राज्यसभेसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाविषयी खुलासा केला. बीकॉम पूर्ण केले नसल्याचे स्मृती इराणींनी म्हटले आहे. यापूर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दूरस्थ शिक्षण पद्धतीने बीकॉमच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण पूर्ण केल्याचा दावा केला होता. मात्र यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणींनी थेट उल्लेख केलेला नाही. इराणी दाम्पत्याकडे ८ कोटी ८४ लाख रुपयांची संपत्ती असून त्यांच्यावर २१ लाखांचे कर्ज आहे.
काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्या संपत्तीमध्येही वाढ झाली असून पटेल दाम्पत्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३५ कोटी २० लाख रुपये आहे. २०११ च्या तुलनेत पटेल यांच्या संपत्तीमध्ये १२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पटेल दाम्पत्याकडे ८ कोटी १५ लाख रुपयांची संपत्ती आहे. काँग्रेसमधून भाजपत येणारे बलवंतसिंह राजपूत हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहे. त्यांच्याकडे ३०० कोटींहून जास्त रुपयांची संपत्ती आहे.