पंजाबमधील राज्यसभेच्या पाच जागांवर निवडणूक होणार असून पंजाब विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने सत्तेवर आलेल्या आम आदमी पार्चीचा पाचही जागांवर विजय निश्चित मानला जात आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये पंजाबचे प्रभारी राघव चढ्ढा, क्रिकेटपटू हरभजन सिंग, रणनीतीकार संदीप पाठक, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे (एलपीयू) संस्थापक अशोक मित्तल आणि उद्योगपती संजीव अरोरा यांना आम आदमी पार्टी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहेत संदीप पाठक? : –

संदीप पाठक यांना त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. संदीप हे अरविंद केजरीवाल यांच्या कोअर टीमचे प्रमुख सदस्य आहेत आणि आयआयटी दिल्लीमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयात पडद्यामागे संदीप पाठक यांची फार महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते. संदीप अनेक वर्षांपासून ‘आप’साठी रणनीतीचे काम करत आहेत आणि पंजाबमध्येही त्यांनी ‘आप’साठी एक अनोखी रणनीती बनवली होती.
पंजाबमध्ये संदीप यांनी गोपनीय पद्धतूने काम केले, ते लाइमलाइटपासून दूर राहिले. उमेदवार निवडीपासून ते जाहीरनामा तयार करण्यापर्यंत संदीप पाठक यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं बोललं जातं. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या मोठ्या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांनी संदीप पाठक यांचेही कौतुक केले आहे.

प्रशांत किशोरसोबत केले आहे काम :

संदीप पाठक यांनी आयआयटी दिल्लीतून उच्च शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे परदेशात काम केले. परदेशातून परतल्यानंतर संदीप यांचा आम आदमी पार्टीमध्ये रणनीतीकार म्हणून प्रवेश झाला आणि ते पंजाबमध्ये ‘आप’साठी काम करू लागले. संदीप यांनी यापूर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत काही काळ काम केले होते.

संदीप पाठक यांच्या व्यतिरिक्त, आम आदमी पार्टीने राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा, क्रिकेटर हरभजन सिंग, एलपीयूचे संस्थापक अशोक मित्तल आणि उद्योगपती संजीव अरोरा यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर भगवंत मान सरकार हरभजन सिंगला खेळाशी संबंधित काही मोठी जबाबदारी देऊ शकते, असे बोलले जात आहे. ३१ मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. पंजाबमध्ये आपचे ९२ आमदार असून पाचही जागांवर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha candidature given to sandeep pathak who played a key role in the victory of aam aadmi party in the punjab assembly elections msr
Show comments