भाजपाला राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळाला आहे. राज्यातल्या राज्यसभेच्या १० पैकी आठ जागांवर भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत भाजपाचे सर्व आठ उमेदवार जिंकले आहेत. तर समाजवादी पार्टीने त्यांचे तीन उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. समाजवादी पार्टीच्या काही आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग केल्यामुळे सपाचा एक उमेदवार पडला आणि त्याच्याऐवजी भाजपाचा एक उमेदवार जिंकला आहे. या विजयाला भाजपाने ‘अंतरात्म्याचा आवाज’ म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अमरपाल मौर्य यांना ३६ मतं मिळाली आहेत. तर आरपीएन सिंह यांना ३४, साधना सिंह यांना ३४, संजय सेठ यांना २९, संगीता बलवंत बिंद यांना ३६, सुधाशं त्रिवेदींना ३८, तेजवीर सिंह यांना ३८ आणि नवीन जैन यांना ३४ मतं मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला सपा उमेदवार जया बच्चन यांना ४१, रामजी लाल सुमन यांना ३७ मतं मिळाली आहे. तर आलोक रंजन यांना १६ मतांसह पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत सपा उमेदवार जया बच्चन यांना सर्वाधिक ४१ मतं मिळाली आहेत.

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे सात आमदार राकेश पांडेय, राकेश प्रताप सिंह, अभय सिंह, विनोद चतुर्वेदी, मनोज पांडेय, पूजा पाल आणि आशुतोष मौर्य यांनी एनडीएला मतदान केलं. ही मतं भाजपा उमेदवार संजय सेठ यांना मिळाली. त्यामुळे ते या निवडणुकीत जिंकू शकले. संजय सेठ २०१९ मध्ये समाजवादी पार्टीला रामराम करून भाजपात गेले होते. दुसऱ्या बाजूला ओ. पी. राजभर यांचा पक्ष एसबीएसपीचे आमदार जगदीश राय यांनी क्रॉस व्होटिंग केलं. त्यांनी त्यांचं मत जया बच्चन यांच्या पारड्यात टाकलं.

हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंसाठी एनडीएचे दरवाजे खुले आहेत? गृहमंत्री अमित शाह म्हणाले…

महाराष्ट्रासह ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक

१३ राज्यांतील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागा रिक्त आहेत. त्यापैकी आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि राजस्थान अशा ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. यामध्ये भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रदेश, केंद्रीय आयटी मंत्री आश्विनी वैष्णव, सोनिया गांधी, मिलिंद देवरा, अशोक चव्हाणांसह अनेक नेते बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या विजयाची आज औपचारिक घोषणा केली जाणार आहे. तर उर्वरित १५ जागांवर चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha election 2024 bjp wins 8 of 10 seats with cross voting in uttar pradesh sp bags 2 asc