राज्यसभेत भाजपचे बळ काहीसे वाढले; हरयाणा, झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का
राज्यसभेच्या २७ जागांसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे एम. व्यंकय्या नायडू, निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी व बीरेंद्र सिंग हे केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल हे प्रमुख उमेदवार विजयी झाले.
राज्यसभेच्या रिक्त झालेल्या ५७ जागांपैकी सात राज्यांमधील २७ जागांसाठी शनिवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी नामांकन परत घेण्याची मुदत ३ जूनला संपल्यानंतर ३० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले होते. शनिवारी ज्या जागांसाठी मतदान झाले, त्यात उत्तरप्रदेशातील ११, कर्नाटक व राजस्थानमधील प्रत्येकी ४, मध्यप्रदेशातील ३, हरयाणा व झारखंडमधील प्रत्येकी २ आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश होता.
उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे सर्व, म्हणजे सातही उमेदवार निवडून आले. बसपने २, तर भाजप व काँग्रेस यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. काँग्रेसच्या तीन मतदारांनी पक्षादेश झुगारून मतदान केल्यानंतरही पक्षाचे उमेदवार कपिल सिबल विजयी ठरले. भाजपच्या एका आमदारानेही पक्षादेश नाकारून समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मत दिले.
राजस्थानमध्ये भाजपने लढवलेल्या चारही जागा जिंकल्या. या भाजपशासित राज्यात पक्षाचे एम. व्यंकय्या नायडू, उपाध्यक्ष ओमप्रकाश, हर्षवर्धन सिंग व रामकुमार वर्मा हे चारही उमेदवार विजयी झाले. काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार येथे पराभूत झाले.
कर्नाटकमध्ये भाजपच्या उमेदवार व केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन निवडून आल्या. तर जद(यू)च्या आमदारांनी पक्षादेश झुगारल्यामुळे काँग्रेसचे नेते जयराम रमेश व ऑस्कर फर्नाडिस यांच्यासह तिसरे उमेदवार के.सी. राममूर्ती हेही विजयी झाले.
मध्यप्रदेशातून ज्येष्ठ पत्रकार एम.जे. अकबर व अनिल माधव दवे हे भाजपचे नेते निवडून आले, तर काँग्रेसतर्फे विवेक तनखा विजयी झाले. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार विनोद गोटिया यांना आवश्यक ५८ मतांपैकी ५० मते मिळवण्यात यश आले, परंतु ते जिंकू शकले नाहीत.
हरयाणामध्ये केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंग व भाजपने पाठिंबा दिलेले ‘झी’चे सुभाषचंद्र हे निवडून आले. झारखंडमधून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि महेश पोद्दार हे भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आले.
उत्तराखंडमधून राज्यसभेची एकमेव जागा काँग्रेसचे प्रदीप टामटा यांनी जिकली.
संभाजीराजेंची नियुक्ती
पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पाया वाढविण्याच्या उद्देशानेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणनू राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. गायत्री परिवाराचे प्रणव पंडय़ा यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, पण त्यांनी सदस्यत्व स्वीकारण्यास नकार दिला होता.

Story img Loader