देशभरात वाढलेल्या बलात्काराच्या घटनांबद्दल राज्यसभेत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच दोषींना फाशी देण्याची मागणी करत हरियाना सरकार बरखास्त करावे अशीही मागणी करण्यात आली.
जिंद येथील एका २० वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेवरून विरोधकांनी हरियानातील हुडा सरकारवर टीकास्त्र सोडले. याखेरीज झारखंडमध्ये महिला पोलिसावरील अत्याचाराचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्र आणि दिल्लीतील घटनांकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. या सर्व राज्यांमध्ये काँग्रेस किंवा त्याच्या मित्र पक्षांची सरकारे असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. सरकार या प्रकरणी चर्चेसाठी तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. दक्षिण दिल्लीत झालेल्या बलात्कार प्रकरणाचा अजून निकाल लागला नसल्याकडे भाजपच्या नजमा हेपतुल्ला यांनी लक्ष वेधले. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी सूचना त्यांनी केली. या प्रकरणी सभागृहाच्या भावना गृहमंत्र्यांकडे पोहचवू, असे आश्वासन सदनात उपस्थित असलेले मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिले.