देशभरात लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. त्यातच ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया दिली. कपिल सिब्बल यांनी मोजणी एजंट्सना (काऊंटिंग एजंट्स) काही सुचना केल्या तसंच त्यांनी निवडणूक आयोगाला एक विनंती देखील केली आहे. बहुतांश एग्झिट पोल्सनुसार देशात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळणार असल्याचं दिसून आलं, त्यावर कपिल सिब्बल यांनी कडाडून टीका केली आहे.
कपिल सिब्बल म्हणाले, मी सर्व काऊंटिंग एजंट्ना विनंती करतो की, जो पर्यंत पूर्ण मतमोजणी होत नाही तसंच विजयाचं प्रमाणपत्र हातात मिळत नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका. पोस्टल बॅलेट मतांच्या मोजणीकडे लक्ष द्या. दहाव्या फेरी किंवा शेवटच्या फेरीआधीच पोस्टल बॅलेट मतांची मोजणी होतेय का याकडे लक्ष द्या. यावेळी सिब्बल यांनी भारत निवडणूक आयोगाला देखील मतमोजणीचे आकडे सातत्याने अपडेट करण्याची विनंती केली आहे. मतांचा कौल कोणाकडे झुकतोय हे जनतेला कळू द्या, असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Delhi: Rajya Sabha MP Kapil Sibal says, "I request the counting agents to not issue certificates of victory till the counting of votes gets complete…The counting of postal ballots should take place before the penultimate round…I request the Election Commission of… pic.twitter.com/4ptPz8jWIY
— ANI (@ANI) June 4, 2024
दरम्यान, कपिल सिब्बल यांनी गोदी मीडियावर टीका केली आहे. एग्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप प्रणित एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील असं दाखवण्यात आलं होतं. त्याकडे लक्ष वेधताना सिब्बल म्हणाले, एनडीएला ३०३ जागांवर देखील मजल मारता येणार नाही. अशा परिस्थितीत सर्वांचे एग्झिट पोल एकसमान कसे काय आले ? असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.