दिग्विजय सिंग आणि मधुसूदन मिस्त्री यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षात नाराजी पसरली असून आगामी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची छायाच या निवडीतून प्रतिबिंबित होत असल्याचे आरोप पक्षावर होत आहेत. मात्र या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाध्यक्षा आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष यांच्या संमतीने आणि राज्यातील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयावरून पक्षात नाराजी असेल असे वाटत नाही, असे रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांना राज्यसभेच्या दाराने खासदारकी मिळविण्याचा मार्ग निवडावा लागणे याचा अर्थ काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे, असा घेतला जात होता. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही या प्रकारामुळे अस्वस्थता पसरल्याच्या बातम्या येत होत्या. त्यातच, काँग्रसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सचिव सज्जनसिंग वर्मा यांनी मध्य प्रदेशातून राज्यसभेवर दिग्विजय सिंग यांना देण्यात आलेल्या उमेदवारीबाबत सवाल उपस्थित केले होते.
या पाश्र्वभूमीवर, सूरजेवाला यांना पक्ष निर्णयाबाबत प्रश्न विचारले गेले. ८६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना जर या वयातही लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची इच्छा असेल, तर दिग्विजय यांनाही तोच मार्ग निवडण्यास काँग्रेसने परवानगी द्यावयास हवी होती, अशी अपेक्षा सध्या लोकसभेतील खासदार असलेल्या वर्मा यांनी व्यक्त केली होती.

Story img Loader