नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुत्सद्देगिरीमुळे काँग्रेसचे राज्यसभेचे मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला व प्रमोद तिवारी हे तीनही उमेदवार विजयी झाले. अपेक्षेप्रमाणे भाजपचे घनश्याम तिवारीही जिंकले पण, काँग्रेसच्या तिसऱ्या उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी भाजपने पािठबा दिलेले अपक्ष उमेदवार सुभाषचंद्र गोयल यांना मात्र पराभव सहन करावा लागला.
काँग्रेसचे रणजीत सुरजेवाला यांना ४३, मुकुल वासनिक यांना ४२ व प्रमोद तिवारी यांना ४१ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा तीन मते जास्त मिळाली. वासनिक यांच्या कोटय़ातील एक मत अवैध ठरले. भाजपचे घनश्याम तिवारी यांना ४३ मते मिळाली. सुभाषचंद्र यांना केवळ ३० मते मिळू शकली. घनश्याम तिवारींना कोटय़ापेक्षा २ मते जास्त मिळाली व शोभाराणींनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे भाजपकडे फक्त २७ अतिरिक्त मते उरली. त्यामुळे सुभाषचंद्र यांना ११ मते कमी मिळून ते पराभूत झाले. जयपूरमध्ये डेरेदाखल झालेले सुभाषचंद्र मतमोजणी होण्याआधीच दिल्लीला रवाना झाल्यामुळे भाजपचा डाव फसल्याचे स्पष्ट झाले. राजस्थान विधानसभेमध्ये २०० जागा आहेत. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी ४१ मतांची गरज होती.
कर्नाटकप्रमाणे राजस्थानमध्येही भाजपला क्रॉस व्होटिंगमुळे धक्का बसला. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या निष्ठावान मानल्या जाणाऱ्या शोभाराणी कुशवाह यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मत दिले. शोभाराणी यांचे पती बी. एल. कुशवाह तुरुंगात आहेत. भाजपच्या आमदार सिद्धीकुमारी यांनी सुभाषचंद्र यांच्याऐवजी धनश्याम तिवारींना मत दिले. शिवाय, भाजपचे आमदार कैलाश मीणा यांनी मतदानावेळी नियमांचा भंग केल्याचेही भाजपचे म्हणणे होते. त्यामुळे शोभाराणी व कैलाश यांची मते अवैध ठरवण्याची मागणी भाजपने केली मात्र, दोन्ही मते निवडणूक आयोगाने वैध ठरवली. भाजपच्या गोटात ‘गोंधळात गोंधळ’ नाटय़ सुरू होते. एका आमदाराकडून मत देताना गडबड झाल्याची कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी दिली. गुरुवारी झालेल्या प्रतिकात्मक मतदानातही भाजपची पाच मते अवैध ठरली होती. भाजपच्या गोटात आदल्या दिवसापासूनच चिंतेचे वातावरण होते.
पक्षीय बलाबल
काँग्रेसकडे १०८, अपक्ष १३, राष्ट्रीय लोक दल १, माकप व बीटीपी प्रत्येकी २ अशी १२६ मते होती. काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पहिल्या पसंतीची ८२ मते दिल्यानंतर, काँग्रेसकडे ३४ अतिरिक्त मते होती. त्यामुळे प्रमोद तिवारी यांना जिंकण्यासाठी ७ मतांची गरज होती. भाजपकडे ७१ आमदार होते. धनश्याम तिवारींना पहिल्या पसंतीची मते दिल्यानंतर उर्वरित ३० मते दुसरे उमेदवार सुभाषचंद्र यांना मिळू शकत होती. हनुमान बेनिवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या ३ आमदारांची मते होती. सुभाषचंद्रांना जिंकण्यासाठी ८ मतांची गरज होती.
कर्नाटकमध्ये भाजपचा तीन जागांवर विजय ; काँग्रेसला एक जागा
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या भांडणात भाजपचा लाभ झाला असून राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा सत्ताधारी पक्षाने जिंकल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ४६, जग्गेश यांना ४४ तर लहरसिंह सिरोया यांना ३३ मते मिळाली. काँग्रेसचे जयराम रमेश ४६ मते मिळवून विजयी झाले.
राज्यसभेसाठी ४ जागा असूनही भाजप ३, काँग्रेस २ व जनता दलाने १ असे ६ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. काँग्रेसचे जयराम रमेश यांना जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे आमदार श्रीनिवास गौडा यांनी मत दिले. त्यामुळे क्रॉस व्होटिंग झाल्याचे उघड झाले. भाजपच्या सीतारामन यांनाही एक मत अधिक मिळाले. सीतारामन व जग्गेश यांना कोटय़ातील ४५ मते दिल्यानंतर भाजपकडे पहिल्या पसंतीची ३२ मते अतिरिक्त होती. सिराया यांना ३३ मते मिळाल्यामुळे क्रॉस व्होटिंगमुळे त्यांनाही अतिरिक्त एक मत मिळाले. जनता दलाचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना केवळ ३० मते मिळाल्याने या पक्षाची दोन मते अन्य पक्षांकडे गेल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसने उभा केलेला दुसरा उमेदवार मंसूर अली खान यांना २५ मते मिळाली. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी ४५ मतांची गरज होती. त्यामुळे चौथ्या जागेसाठी भाजप, काँग्रेस आणि जनता दल या तीनही पक्षांमध्ये चुरस झाली.