सात राज्यांतील राज्यसभेच्या २७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये उत्तरप्रदेशमधून समाजवादी पक्षाचे ७ आणि बसपाचे दोन उमेदवार आणि भाजपचा एक उमेदवार विजयी झाला. काँग्रेस नेते कपिल सिब्बल हेदेखील बसपाच्या पाठिंब्यावर उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले आहेत. तर हरियाणातून भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा विजयी झाले. राजस्थानमध्ये भाजपने चारही जागांवर विजय मिळवला. भाजप नेते व्यंकय्या नायडू, ओम प्रकाश माथूर, हर्षवर्धन सिंग आणि रामकुमार वर्मा यांनी राजस्थानातून विजय मिळवला. याशिवाय, भाजपचे एमजे अकबर आणि अनिल माधव दवे हे मध्यप्रदेशमधून विजयी झाले.
कर्नाटकमधून केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन, काँग्रेस नेते जयराम रमेश, ऑस्कर फर्नांडिस, के.सी. राममूर्ती विजयी झाले. तसेच झारखंडमधून भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी सहजपणे निवडून आले. यावेळी राज्यसभेच्या ५७ जागा रिकाम्या झाल्या होत्या. यापैकी ३० जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने २७ जागांसाठी निवडणूक झाली होती.