१०० कोटी रुपये खर्च करून काही लोकांनी राज्यसभेचे सदस्यत्व मिळवले असल्याचा खळबळजनक दावा करून काँग्रेसचे वरिष्ठ नेते चौधरी बिरेंदर सिंग यांनी एका नव्या वादाला सुरुवात केली आहे. नंतर त्यांनी आपण असे बोललो नव्हतो, प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केला असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला अशा प्रकारे सौदेबाजी करण्याची सवयच आहे. आता त्यांनी देशाच्या राजकारणातही तेच आणले असून हीन पातळी गाठली आहे, असा आरोप भाजपने यासंदर्भात केला आहे.
जिंद येथे एका मेळाव्यात बिरेंदर सिंग यांनी सांगितले की, राज्यसभेचे सदस्यत्व १०० कोटी रुपयांना मिळते, सगळा खर्च वजा जाता हे सदस्यत्व तरीही ८० कोटीत मिळते व २० कोटी रुपयांची बचत होते. जर एखादी व्यक्ती ८० किंवा १०० कोटी खर्च करून राज्यसभेची खासदार होत असेल तर ती गरिबांचा विचार कसा करू शकेल.
त्यावर सफाई देताना बिरेंदर सिंग म्हणाले की, अलीकडे एक नवीन राजकीय वर्ग उदयाला आला आहे. धनशक्ती असलेले लोक लोकसभा व राज्यसभेत येऊ लागले आहेत. एवढेच आपल्याला सांगायचे होते, आपण वृत्तपत्रातील माहितीच्या आधारे आकडे सांगितले. २००९ मध्ये लोकसभेचे निकाल लागले त्यावेळी वृत्तपत्रातील बातम्यात जिंकून आलेल्या ३६० उमेदवारांची माहिती दिली होती. त्यातील अनेक करोडपती होते, साधारण १८ जण अब्जाधीश होते, असा उल्लेख आपण केला.
संसदीय लोकशाहीत धनशक्तीला महत्त्व आले आहे हेच यातून सूचित होते एवढेच सांगण्याचा त्यामागचा हेतू होता. राजकारणात येण्यासाठी काही लोक करोडो रुपये खर्च करतात. जर अशा घटकांचा प्रभाव वाढणार असेल तर ते गरिबांच्या बाजूने प्रश्न कसे मांडू शकतील, असा सवालही बिरेंदर सिंग यांनी केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा