Rajya Sabha Elections : नुकताच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत १२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यापैकी भाजपाचे नऊ, तर भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट एक, राष्ट्रीय लोकमंचचा एक आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेत एडीएच्या सदस्यांची संख्या ११२ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या संख्येसह एनडीएला आता राज्यसभेत बहुमत प्राप्त झाले आहे.
नऊ सदस्यांसह भाजपाची संख्या ९६ वर
नऊ सदस्य निवडून आल्यानंतर आता राज्यसभेत भाजपाच्या सदस्यांची संख्या ९६ वर पोहोचली आहे. तर विरोधकांची एकूण संख्या ८५ वर आली आहे. राज्यसभेच्या एकूण २४५ जागा आहेत. त्यापैकी आठ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये जम्मू काश्मीरमधील चार आणि राष्ट्रपती नियुक्त चार जागांचा समावेश आहे. आहेत. त्यामुळे सद्यस्थिती राज्यसभेचे २३७ सदस्य आहेत. त्यानुसार बहुमतासाठी ११९ सदस्य असणे आवश्यक आहे.
निवडून आलेल्या १२ सदस्यांमध्ये कुणाचा समावेश
भाजपाचे जे नऊ सदस्य निवडून आले आहेत, त्यामध्ये आसाममधून रामेश्वर तेली आणि मिशन रंजन दास, बिहारमधून मनन कुमार मिश्रा, हरियाणातून किरण चौधरी, मध्यप्रदेशामधून जॉर्ज कुरीअन, महाराष्ट्रातून धर्यैशील पाटील, ओडिशांतून ममता मोहंता, राजस्थानमधून रवनीत सिंह बिट्टू आणि त्रिपुरातून राजीव भट्टाचार्जी यांच्या समावेश आहे.
काँग्रेसच्या एका उमेदवाराचीही बिनविरोध निवड
याशिवाय भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नितीन पाटील तसेच बिहारमधील राष्ट्रीय लोक मोर्चाचे उपेंद्र कुशवाह यांचा समावेश आहे. काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी सुद्धा राज्यसभेत बिनविरोध निवडून आले आहेत.
हेही वाचा – MP Kangana Ranaut: भाजपाने खासदार कंगना रणौत यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्यापासून फारकत का घेतली?
दशकभरापासून राज्यसभेत बहुमत मिळवण्याचा एनडीचा प्रयत्न
महत्त्वाचे म्हणजे एनडीए गेल्या दशकभरापासून राज्यसभेत बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता बऱ्याच काळानंतर एनडीएला राज्यसभेत बहुमत मिळालं आहे. या बहुमतानंतर आता विरोधकांच्या विरोधानंतरही एनडीएला विधेयकं पारीत करणं सोप्प जाणार आहे. मागच्या काही वर्षांत विरोधकांकडे बहुमत असल्याने त्यांनी भाजपा सरकारने आणलेल्या बहुतेक विधेयकांना विरोध करत ते रोखून धरले होते. त्यामुळे एनडीएवर बिजू जनता दल सारख्या पक्षांना हाताशी घेऊन ही विधेयकं पारीत करण्याची वेळ आली होती.