शेतकरी नेते राकेश टिकैत कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर आक्रमक झालेत. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर थेट अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना टॅग करत शेतकरी आंदोलनाकडे लक्ष देण्याची मागणी केलीय. मागील ११ महिन्यात शेतकरी आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बायडन यांनी मोदींसोबत चर्चा करावी, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केलीय. त्यांनी याबाबत ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
राकेश टिकैत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “आम्ही भारतीय शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहोत. आंदोलन करताना मागील ११ महिन्यात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. आम्हा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी हे कायदे मागे घेतले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत आमच्या प्रश्नांवर लक्ष द्याल.”
यावेळी राकेश टिकैत यांनी बायडन स्पिक्स अप फॉर फार्मर असा हॅशटॅगही वापला. इतकंच नाही तर टिकैत यांनी याआधीच्या एका ट्विटमध्ये अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये अनिवासी भारतीय शेतकऱ्यांनी मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्याविरोधात आंदोलन केल्याचंही ट्विट केलंय.
“भाजपकडून हिंदुत्वाच्या नावावर तिकीट वाटप, आता सरकारचा घंटा वाजणार”
दरम्यान, शेतकरी नेते आणि भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकेत सध्या उत्तर प्रदेशमध्ये चांगलेच सक्रीय झालेले दिसत आहे. आता त्यांनी आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारचा घंटा वाजणार असल्याचं विधान केलंय. तसेच हे वादळ आता पूर्वांचलकडे जाणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय. मागील १० महिन्यांपासून शेतकरी देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकायला तयार नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. ते बडनगरमध्ये बोलत होते.
राकेश टिकेत यांना पत्रकारांनी बडनगरला पुन्हा कधी येणार असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, “जेव्हा केव्हा इकडं कार्यक्रम ठरेल तेव्हा पुन्हा येईल. हा राष्ट्रीय महामार्ग आहे. यावरुन जाण्याचा सर्वांना अधिकार आहे.”
“सरकार १० महिन्यांपासून शेतकऱ्यांची मागणी ऐकत नाहीये”
बडनगरमधील घंट्याविषयी बोलताना ते म्हणाले की हा घंटा खराब झाला तर तो दुरुस्ती करण्याची जबाबदारी संघटनेची असेल. खराब झाल्यानंतर दुसरा घंटा लावत राहू. जोपर्यंत घंटा राहिल तोपर्यंत संघटना राहिल, टिकेत नाव राहिल. सरकार १० महिन्यांपासून शेतकऱ्यांची मागणी ऐकत नाहीये. किमान घंट्याच्या निमित्ताने तरी ऐकेल अशी आशा आहे. ते हिंदुत्वाच्या नावावर निवडणुकीत तिकीट देणार आहेत. आम्ही घंटा वाजवला, शंखही वाजवला, आता या सरकारचा घंटा वाजणार आहे. हे वादळ आता इथून पूर्वांचलच्या दिशेने जाईल.”