परदेशी बँकांमध्ये दडवून ठेवलेले काळे धन भारतात परत आणण्यास केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच खजिन्यापेक्षा हे काळे धन भारतात परत आणण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एक हजार टन सोने जमिनीत दडलेले असल्याचा दृष्टान्त आपल्याला झाला असल्याचे एका साधूने सांगितल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागाने ते सोने शोधण्यासाठी खोदकाम सुरू केल्याच्या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी वरील वक्तव्य केले आहे.
सरकारच्या या कृतीमुळे संपूर्ण जग आपल्याला हसत आहे, कोणाला तरी दृष्टान्त होतो आणि सरकार उत्खनन सुरू करते, भारतातील काही जणांनी परदेशी बँकांमध्ये जे काळे धन दडवून ठेवले आहे ते एक हजार टन सोन्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. ते धन परत आणले तर सोन्यासाठी खोदकाम करण्याची गरजच भासणार नाही, असेही मोदी म्हणाले.
बदलाच्या चक्रीवादळाने सध्या देशाला चांगलाच विळखा घातला आहे. त्यामुळे पायलिन वादळाचा परिणाम झालेला नाही. काँग्रेसमुक्त भारताचे जनतेचे स्वप्न असून तामिळनाडूत भाजपचा प्रभाव नगण्य असला तरी तेथील जनतेच्या मनातही काँग्रेसमुक्त भारताचीच लाट आहे, असेही ते म्हणाले.