लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनामध्ये होत आहे. गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र संबंध, रस्तेविकास, माहिती-तंत्रज्ञान, रेल्वे आणि शिक्षण ही महत्त्वाची खाती भाजपकडे राहतील. मोदींसह भाजप व घटक पक्षांतील ३० जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजप व ‘एनडीए’तील घटक पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. जनता दलाने (सं) रेल्वे तर, तेलुगु देसमने माहिती-तंत्रज्ञान, रस्तेविकास या खात्यांची मागणी केली असली तरी या खात्यांची राज्यमंत्रिपदे त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे.

जनता दल व तेलुगु देसम या दोन्ही प्रमुख घटक पक्षांना अनुक्रमे किमान २ आणि ४ केंद्रीय मंत्रिपदे दिली जाऊ शकतील. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, जनता दल (ध), राष्ट्रीय लोकदल, लोकजनशक्ती पक्ष, अपना दल, हिंदुस्तान अवामी मोर्चा, जनसेना, रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांनाही स्थान दिले जाईल. यापैकी अनेक पक्षांनी किमान दोन मंत्रिपदाची मागणी केली असली तरी, मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल असे समजते. दरम्यान, शपथविधीचे काँग्रेस नेत्यांना अद्याप आमंत्रण मिळाले नसल्याचे पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>आज रालोआचा शपथविधी; मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात ३० जणांच्या समावेशाची शक्यता

भाजपचे नेते राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन व एस. जयशंकर, नितीन गडकरी, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मंडाविया, सर्बानंद सोनोवाल, किरेन रिजिजू, बिप्लब देब, गजेंद्र सिंह शेखावत, ज्योतिरादित्य शिंदे, प्रल्हाद जोशी आदींची केंद्रीय मंत्रिपदे कायम राहू शकतील.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, संजय जयस्वाल, राजीव प्रताप रुडी, जितीन प्रसाद, संजय बंडी, केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे थिसूरचे सुरेश गोपी, जितेंद्र सिंह या नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, पवार गटाचे प्रफुल पटेल यांना मंत्री केले जाऊ शकते. भाजपमधून नारायण राणे व उदयनराजे भोसले व रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

घटक पक्षांमध्ये एच. डी. कुमारस्वामी (जनता दल-ध), अनुप्रिया पटेल (अपना दल), जयंत चौधरी (आरएलडी), चिराग पासवान (एलजेपी), जितन मांझी (एचएपी), ललन सिंह व रामनाथ ठाकूर (जनता दल झ्रसं), राममोहन नायडू, हरीश बालयोगी व दग्गुमाला प्रसाद (तेलुगु देसम) आदींचा समावेश केला जाणार असल्याचे समजते.