भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे खासदार राम जेठमलानी यांनी भाजपला पुन्हा एकदा घरचा अहेर दिला आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी रणजीत सिन्हा यांची तडकाफडकी नियुक्ती झाल्याने काँग्रेसवर टीका करणाऱ्या स्वपक्षाच्या नेत्यांना जेठमलानी यांनी शनिवारी फटकारले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणी केलेली टीका अनाठायी आहे, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने केंद्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी रणजीत सिन्हा यांची घाईघाईत नेमणूक केल्याने राजधानीत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच राजकीय वर्तुळात या निर्णयाचे पडसाद उमटले होते. भाजपनेही या प्रकरणी केंद्रावर जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारने या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजपचे नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे शुक्रवारी पत्राद्वारे केली होती. या पत्रामुळे केंद्र सरकार अडचणीत येणार, असे वाटत असतानाच जेठमलानी यांनी शनिवारी उघडपणे विरोधी विधान करुन भाजपला अडचणीत आणले. ‘आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सीबीआयच्या संचालकांच्या नियुक्तीवरुन केंद्र सरकारवर केलेल्या टीकेमुळे मी आश्यर्चचकीत झालो आहे. सिन्हा यांची नियुक्ती कोणत्या परिस्थितीत करण्यात आली, या संबंधित कारणांकडे आमच्या नेत्यांनी डोळेझाक केली आहे, त्यामुळे त्यांनी केलेली टीका अनाठायी आहे, याशिवाय सिन्हा यांच्या एका हितशत्रुच्या चिथावणीमुळेच आमच्या नेत्यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे,’ अशा आशयाचे पत्रक जेठमलानी यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना दिले. या पत्राच्या प्रती त्यांनी नितीन गडकरी व पंतप्रधानांनाही धाडल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा