ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे. केजरीवाल यांनीच केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात अपशब्द वापरायला सांगितलं होतं, असा दावा जेठमलानी यांनी केला आहे. विशेष म्हणजे २० जुलैला जेठमलानी यांनी केजरीवाल यांना पत्र पाठवून जेटलींनी दाखल केलेल्या मानहानीचा खटला लढण्यास नकार कळवला होता.

जेठमलानी यांनी वकिली सोडत असल्याचं केजरीवाल यांना पत्र पाठवून सांगितलं होतं. तसंच त्या पत्राची एक प्रत त्यांनी जेटली यांनाही पाठवल्याचं समोर आलं आहे. अरुण जेटली यांनी मानहानीचा पहिला खटला दाखल केल्यानंतर तुमच्या बाजूनं मी न्यायालयात लढलो. केजरीवाल, तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला विचारा आणि सांगा की तुम्ही किती वेळा जेटलींविरोधात अपशब्द वापरले होते, असा सवालही जेठमलानी यांनी या पत्रातून केजरीवाल यांना केला आहे. जेठमलानी यांनी न्यायालयात जेटलींविरोधात अपशब्द वापरल्यानं जेटलींनी केजरीवाल यांच्याविरोधात मानहानीचा आणखी एक खटला दाखल केला आहे. तत्पूर्वी, केजरीवाल यांनी जेटलींवर डीडीसीए घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जेटलींनी केजरीवाल यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. केजरीवाल यांच्यावतीनं हा खटला जेठमलानी लढत होते. न्यायालयात सुनावणीदरम्यान जेठमलानी यांनी जेटलींविरोधात अपशब्द वापरले होते. केजरीवाल यांनी सांगितल्यानं आपण अपशब्द वापरले, असा दावा जेठमलानी यांनी केला होता. पण आपण असं काही सांगितलंच नाही, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळं जेठमलानी केजरीवालांवर नाराज आहेत. २० जुलै रोजी जेठमलानी यांनी केजरीवालांना एक पत्र लिहिलं. त्यात तुम्ही सांगितलं म्हणून आपण जेटलींविरोधात अपशब्द वापरले, असा खुलासा त्यांनी केला. त्याची एक प्रत जेटलींनाही पाठवली होती. तसंच आपण आता तुमच्या बाजूनं खटला लढवू शकत नाही, असंही जेठमलानी यांनी सांगितलं होतं.

Story img Loader