देशभर सध्या २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे राजकीय तर दुसरीकडे धार्मिक वातावरण दिसत आहे. पण त्याचवेळी अयोध्येमध्ये काहीतरी वेगळंच घडत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे अयोध्येतील रुग्णालय प्रशासन चक्रावले आहेत. २२ जानेवारी रोजी रामलल्लासोबतच आपल्या बाळाचाही जन्म व्हावा, यासाठी गर्भवती माता शस्त्रक्रियेसाठी (सिझेरियन प्रसूती) तयार असल्याचे अर्ज रुग्णालयांकडे येत आहेत. त्यामुळे नेमकं यावर काय करावं असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडतंय अयोध्येत?

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्येतील प्रसूती रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येनं दाम्पत्यांचे अर्ज येऊ लागले आहेत. ज्या महिलांची प्रसूती तारीख २२ जानेवारीच्या जवळपास आहे, अशा महिलांनी २२ जानेवारीलाच आपल्या बाळाचा जन्म व्हावा, अशी विनंती करणारे अर्ज करायला सुरुवात केली आहे. रामलल्लांच्या आगमनाबरोबरच आपल्या बाळाचाही जन्म व्हावा, अशी इच्छा या दाम्पत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यासही ही दाम्पत्य तयार असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात इंडिया टुडेनं कानपूर सरकारी रुग्णालयातील विभागप्रमुखांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.

“रुग्णालयाच्या लेबर रूममध्ये आम्हाला रोज १४-१५ दाम्पत्यांकडून २२ जानेवारीलाच डिलिव्हरी व्हावी, असे अर्ज येत आहेत. अशा स्थितीत सामान्य पद्धतीने प्रसूती होणं निव्वळ अशक्य आहे. आम्ही त्यांना यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल, हे समजावून सांगितलं आहे. रुग्णालयाने आत्तापर्यंत २२ जानेवारी रोजी ३५ शस्त्रक्रियांचं नियोजन केलं आहे. आम्ही एरवी दिवसाला फक्त १४ ते १५ शस्त्रक्रिया करतो”, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. सीमा द्विवेदी यांनी दिली आहे.

“अयोध्येत राम मंदिराच्या जागी आधी गौतम बुद्धांचं मंदिर होतं, उत्खनन केलं तर…”; रामदास आठवलेंचा दावा

“आम्ही १०० वर्षांपासून राम मंदिराची वाट पाहात आहोत”

दरम्यान, काही गर्भवती महिलांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. “रामलल्लांच्या आगमनाच्या दिवशीच आमच्या बाळाचा जन्म व्हावा अशी आमची इच्छा आहे. गेल्या १०० वर्षांपासून आम्ही राम मंदिराची वाट पाहात आहोत. आमच्या बाळाचं या जगात आगमन होण्यासाठी हा एक खूप सुदैवी योग असेल”, अशी प्रतिक्रिया एका गर्भवती महिलेनं दिली आहे.

प्रसूतीमधील अडचणींकडेही दुर्लक्ष?

दरम्यान, डॉ. सीमा द्विवेदी यांनी पीटीआयशी बोलताना यावर सविस्तर भूमिका मांडली आहे. “हे फार विचित्र आहे. अनेकदा आम्हाला पालकांकडून अशा प्रकारच्या विनंती येतात. काही पालक तर त्यांना कुणीतरी सांगितलेल्या मुहूर्तावरच बाळाचा जन्म व्हावा यासाठी मागे लागतात. अशा वेळी मुदतपूर्व प्रसूतीमधून निर्माण होणाऱ्या अडचणींकडेही दुर्लक्ष करण्याची त्यांची तयारी असते”, असं द्विवेदी यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram mandir ayodhya pregnant women requests 22 january c section delivery ram lalla pmw
Show comments