सर्वोच्च न्यायालयाच्या नोव्हेंबर २०१९ मधील निकालामुळे अयोध्येत राम मंदिर बांधणीचा मार्ग मोकळा झाला. १९८० सालापासूनच हा विषय आरएसएस-भाजपाच्या टॉप अजेंडयावर होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपा, बजरंग दल आणि संघ परिवारातील अन्य संस्थांनी आपली संघटनात्मक ताकत राम जन्मभूमी आंदोलनाच्या मागे उभी केली. त्यामुळे हा एक प्रखर सामाजिक-राजकीय मुद्दा बनला.

८०-९० च्या दशकात देशात रामजन्मभूमी आंदोलन एक मोठी चळवळ होती. या आंदोलनाशी पाच मोठी नावे जोडली आहेत. त्याचा आपण आता आढावा घेऊया.

लालकृष्ण आडवाणी
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी राम जन्मभूमी आंदोलनात हिंदुत्वाचा प्रमुख चेहरा होते. १९९० साली त्यांनी गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्येतील राम जन्मभूमी स्थळ असा देशव्यापी रोड शो सुरु केला. टोयाटाच्या बसलाच त्यांनी रथामध्ये बदलून टाकले होते. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी मोठया प्रमाणावर पाठिंबा मिळवला. आडवणींची रथयात्रा अयोध्येत पोहोचण्यापूर्वी बिहारचे तत्कालिन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आडवणींच्या अटकेचा आदेश काढला. आडवणी या आंदोलनाचा मुख्य चेहरा होते.

प्रमोद महाजन
राम जन्मभूमी आंदोलनात त्यावेळी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका होती. वाजपेयी-आडवाणींसोबत सावली सारखे दिसणारे प्रमोद महाजन राजकीय रणनितीकार होते. खरंतर लालकृष्ण आडवाणी सोमनाथ ते अयोध्या अशी पदयात्रा काढणार होते. पण प्रमोद महाजन यांच्या सल्ल्यावरुनच आडवाणींनी पदयात्रेचा विचार सोडून रथयात्रा काढली.

१९९० साली प्रमोद महाजन भाजपाचे सरचिटणीस होते. त्यांनी आडवाणींना रथयात्रा काढण्याचा सल्ला दिला. त्यांनी आडवाणींना २५ सप्टेंबरला दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी किंवा दोन ऑक्टोंबरला महात्मा गांधींच्या जयंतीदिनी रथयात्रा सुरु करण्याचा सल्ला दिला होता. आडवणींनी १० हजार किमीच्या पदयात्रेसाठी २५ सप्टेंबरची तारखी निवडली.

अशोक सिंघल
राम जन्मभूमी आंदोलनाच्या मागे जनमत उभे करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी पूर्ण निष्ठेने काम केले. अनेकांच्या मते ते राम मंदिर चळवळीचे मुख्य आर्किटेक होते. २०११ पर्यंत ते विहिपचे प्रमुख होते. प्रकृतीच्या तक्रारीमुळे नंतर त्यांची सक्रियता कमी झाली. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

मुरली मनोहर जोशी
मुरली मनोहर जोशी पेशाने प्राध्यापक होते. पुढे ते भाजपामध्ये दाखल झाले. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली, त्यावेळी जोशी आडवाणींसोबत तिथे होते. या प्रकरणी त्यांच्यावर सुद्धा खटला सुरु आहे.

उमा भारती
उमा भारती या राम जन्मभूमी आंदोलनात प्रभावशाली महिला नेत्या होत्या. नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये त्या मंत्रीपदावर होत्या. आज अयोध्येत राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी भाजपा नेत्या उमा भारती अयोध्येमध्ये असतील. पण त्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.  करोना व्हायरसच्या उद्रेकामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अन्य व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे असे उमा भारती म्हणाल्या. पंतप्रधान मोदी आणि सर्वजण तिथून निघून गेल्यानंतर मी रामललाचे दर्शन घेण्यासाठी तिथे जाईन असे उमा भारती यांनी सांगितले आहे.

Story img Loader