अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवार, ५ ऑगस्टला पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी अयोध्येत जाऊन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.
५ ऑगस्ट, बुधवारी दुपारी साडेबारा वाजता राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ नंतर अयोध्येत पोहोचतील. ते हनुमान गढीला भेट देऊन हनुमानाची पूजा करतील आणि नंतर रामलल्लाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते भूमिपूजन समारंभात सहभागी होतील, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले. दरम्यान, जगतगुरू स्वामी स्वरूपानंदजी महाराज हे द्वारकापीठाचे शंकराचार्य असून त्यांनी ५ ऑगस्टचा मुहूर्त अशुभ असल्याचे सांगितल्याने भूमिपूजन समारंभ रद्द करावा, असे आवाहन काँग्रेसनेते दिग्विजय सिंह यांनी केल्याने नव्या वादास तोंड फुटले.
आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजन : असा असेल पंतप्रधानांचा ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम
करोनाच्या उद्रेकामुळे कमीत कमी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. निमंत्रितांच्या यादीतील काही नावे वगळण्यात आली असून, फक्त १७५ जण सोहळ्यात सहभागी होतील. त्यापकी १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले. अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी भगव्या रंगातील निमंत्रण पत्रिका सोमवारी जाहीर करण्यात आली. निमंत्रण पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास या पाच मान्यवरांची नावे आहेत.
पाहा फोटो >> राम मंदिराचे फोटो आले समोर, पाहा कसं असेल मंदिर
अडवाणी, जोशी आणि उमा भारती नाहीत –
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती हे तिघेही भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार नाहीत. करोनामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय उमा भारती यांनी आधीच जाहीर केला होता. अडवाणी व जोशी यांना फोन करून निमंत्रण देण्यात आले. पण, ९० वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेल्या मान्यवरांनी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अयोध्येला येणे उचित ठरणार नाही. आम्ही त्यातील अनेकांना फोन करून क्षमाही मागितली आहे, असे चंपत राय यांनी सांगितले. प्रत्यक्ष समारंभाला येऊ न शकणाऱ्यांना दूरचित्रसंवाद व्यवस्थेद्वारे सोहळा पाहता येईल. निमंत्रण पत्रिकेवर सुरक्षाकोड असल्याने समारंभाच्या ठिकाणी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश मिळू शकेल.