Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना एका राम भक्ताला हृदयविकाराचा झटका झाला. यावेळी मंदिराच्या आवारात मदतीसाठी उपस्थित असलेल्या हवाई दलाच्या जवानांनी तात्काळ मदत दिल्यामुळे सदर भाविकाचे प्राण वाचले. हवाई दलाच्या वतीने मंदिराच्या परिसरात मोबाइल रुग्णालय तैनात केले होते. आपत्कालीन परिस्थितीत उपचार देता यावेत, यासाठी ही सोय करण्यात आली होती. यामुळे भाविकाचे प्राण वाचू शकले. हवाई दलाने एक्स अकाऊंटवर आपल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत ही बातमी दिली आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना रामकृष्ण श्रीवास्तव (६५) हे मंदिर परिसरातच कोसळले. त्यानंतर विंग कमांडर मनीष गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना काही मिनिटातच तिथून बाहेर काढले. या पथकाने मंदिर परिसरातच त्यांच्यावर उपचार केले. श्रीवास्तव यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण उच्चपातळीपर्यंत वाढले असल्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावल्याचे सांगितले जाते. हवाई दलाच्या मोबाइल रुग्णालयात श्रीवास्तव यांच्यावर उपचार केले गेले. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रविवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपत्कालीन प्रसंगात उपचार देण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. हवाई दलाच्या वतीने मोबाइल रुग्णालय म्हणजेच व्हॅनमधील उपचार केंद्र उभारले होते. एखादी अनुचित घटना घडल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांत उपचार दिल्यास रुग्णाचे प्राण वाचतात. ज्याला वैद्यकिय भाषेत ‘गोल्डन अवर’ म्हटले जाते. या सुरुवातीच्या काही तासात योग्य आणि अचूक उपचार दिल्यास रुग्णांचा जीव वाचवता येतो.

आज (२२ जानेवारी) अयोध्येत संपन्न झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहल्यासाठी संपूर्ण जग आणि देशभरातून १० हजार निमंत्रित उपस्थित राहिल्याचे सांगितले जाते. यामध्ये हजारो साधू-संताची उपस्थिती होती. अनेक सेलिब्रिटी, क्रीडापटू, पद्म पुरस्कार विजेते, कारसेवक आणि महत्त्वाची लोक यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली.