अयोध्येतील नव्यानं उभारण्यात आलेल्या मंदिरात २२ जानेवारीला प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे वादाला तोंडा फुटण्याची शक्यता आहे. “मशीद तोडून तिथे मंदिर बांधलं जात असेल, तर त्याचं आम्ही समर्थन करू शकत नाही,” असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी गुरूवारी ( १८ जानेवारी ) केलं आहे.
उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले?
“द्रमूक कुठल्याही धार्मिक श्रद्धेच्या विरोधात नाही. पण, मशीद तोडून तिथे मंदिर बांधलं जात असेल, तर त्याचं आम्ही समर्थन करू शकत नाही,” असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते एम. करूणानिधी यांचा उल्लेख करत केलं आहे.
हेही वाचा : अग्रलेख : सनातनी (धर्म) संकट!
“सनातन धर्मालाही संपवायचं आहे”
याआधी उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरिया आजाराशी तुलना केल्यानं चर्चेत आले होते. “सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे,” असं वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं.
या विधानानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर देशभरातून टीका होत होती. ठिकठिकाणी उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आली होती. तसेच, त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा : ‘भेदाभेद अमंगळ’ हेचि तो अर्थ ‘सनातन’!
विधींच्या पूर्तीनंतर अयोध्येतील नवीन मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
दरम्यान, अयोध्येत नव्यानं उभारण्यात आलेल्या मंदिरातील प्रभू श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधींना मंगळवारपासून सुरूवात झाली. या विधींच्या पूर्तीनंतर अयोध्येतील नवीन मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाला आठ हजार निमंत्रित उपस्थित राहणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी संबोधित करणार आहेत.