अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. मागील काही दिवसांपासून अयोध्येत या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. पायाभरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. “पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार आहे. मला निमंत्रण देऊन या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार. आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक आहे. कित्येक दशकांची प्रतिक्षा आज संपत आहे,” असं मोदी म्हणाले. मात्र आता या राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली असली तरी ते कधीपर्यंत बांधून पूर्ण होईल यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच श्री राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्टचे विश्वस्त असणाऱ्या स्वामी परमानंद महाराज यांनी खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा  खास फोटो >> राम मंदिराचे फोटो आले समोर, पाहा कसं असेल मंदिर

किती काळ लागणार?

राम मंदिर बांधण्याचं काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल असा विश्वास स्वामी परमानंद महाराज यांनी ‘एबीपी न्यूज’शी बोलताना व्यक्त केला. “भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर लगेचच मंदिर निर्माणाचं काम सुरु करण्यात येणार आहे. ट्रस्टने मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कंपनीला संपूर्ण मंदिर उभारण्यासाठी ३२ महिन्यांचा कालावधी दिला आहे,” असं स्वामी परमानंद महाराज म्हणाले. स्वामी परमानंद महाराजांनी सांगितलेल्या वेळेमध्ये मंदिराचे काम पूर्ण झाल्यास अयोध्येमध्ये २ वर्ष आठ महिन्यांमध्ये म्हणजेच २०२३ च्या एप्रिल महिन्यामध्ये मंदिराच्या पूर्णपणे तयार असेल. देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिलापूजन झालं आहे तेथील शिलांचा वापर राम मंदिर निर्माणामध्ये केला जाणार असल्याचे स्वामी परमानंद महाराजांनी स्पष्ट केलं.

…आणि सुरु झालं मंदिराचं काम

बाबरी मशिद रामजन्मभूमी वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात म्हटलं होतं. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला. हा निकाल देतानाच सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेशही केंद्र सरकारला दिले होते. न्यायालयाच्या निर्णयप्रमाणे केंद्र सरकारनं रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास स्थापना केली. तसेच अध्यक्ष आणि विश्वस्तांची नेमणूक केली. त्यानंतर राम मंदिराचं काम सुरू होण्याच्या दृष्टीनं पावलं पडली होती.

नक्की पाहा  खास फोटो >> पाहा राम मंदिरासाठी खोदकाम करताना नक्की कोणते पुरातन अवशेष सापडले

कसं असणार मंदिर?

न्यासचे सदस्य कामेश्वर चोपाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत. राम मंदिर भव्य असणार आहेच, त्याचबरोबर तीन मजली उभारण्यात येणार आहे. सीता रसोई येथेच सीता मंदिर उभारण्यात येणार आहे. मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या दगडांचा शोध घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे.

नक्की पाहा  खास फोटो  >> “जय श्री राम… जय श्री राम…” जयघोषाने अयोध्याच नाही तर अमेरिकेची राजधानीही दुमदुमली

आतापर्यंत मंदिरासाठी ८० हजार घनफूट दगड घडवण्यात आले आहेत. राम मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजित खर्च ३०० कोटी रुपये इतका असणार आहे. तर परिसरातील २० एकर जागेचं सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक हजार कोटी इतका खर्च केला जाण्याची शक्यता आहे.