महेश सरलष्कर, लोकसत्ता
अयोध्या : येथील नव्या अतिभव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या दिमाखदार सोहळयाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच त्यापूर्वी भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. सध्या अयोध्येमध्ये दररोज ८० हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज असून प्राणप्रतिष्ठेनंतर हा आकडा २ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
राम मंदिराच्या तळमजल्यावर रामलल्लाच्या सुमारे पाच फूट उंचीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या नव्या मूर्तीबरोबर रामलल्लाची आधीची मूर्तीही विराजमान असेल. तसेच भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न यांच्याही पुरातन मूर्ती असतील. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असेल. तिथे राम व तिघा बंधूंसह सीतामाईची मूर्ती असेल, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे (न्यास) महासचिव चंपत राय यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. रामलल्लाच्या नव्या मूर्ती घडविण्याचे काम चार-पाच शिल्पकारांना दिले आहे. काळया दगडातील, संगमरवरी अशा या मूर्ती आहेत. त्यातून एका मूर्तीची १५ जानेवारीपर्यंत निवड केली जाईल. निवडीचे निकष स्पष्ट करण्यास मात्र राय यांनी नकार दिला. राम मंदिराची उभारणी व रामलल्लाची मूर्ती आदी कार्य न्यासाचे आहे. हे कार्य सरकारी नसल्याने प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेची गरज नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>> वाघांच्या मृत्यूबाबतच्या आकडेवारीत तफावत; ‘एनटीसीए’ आणि ‘डब्ल्यूपीएसआय’कडे वेगवेगळया नोंदी
सर्वसामान्यांना २२ जानेवारीनंतरच नव्या राम मंदिरात दर्शन घेता येणार असले तरी आतापासून शहरात भाविकांची गर्दी दिसू लागली आहे. रामलल्लाच्या विद्यमान मूर्तीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसाला ८० हजापर्यंत पोहोचल्याचा दावा संबंधितांनी केला असून राम मंदिर खुले झाल्यानंतर दररोज सुमारे २ लाख तर उत्सवाच्या काळात ३ लाखांहून अधिक भक्त येतील, असा अंदाज आहे.
सोहळयाला आठ हजार निमंत्रित
प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी सुमारे आठ हजार जणांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात जवळजवळ चार हजार संतमहंत असून कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील सुमारे आडीच हजार मान्यवरांना निमंत्रण पत्रिका धाडण्यात आल्या आहेत. निमंत्रितांमध्ये अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव निमंत्रितांना २१ जानेवारीला दुपापर्यंत अयोध्येत पोहोचण्याची विनंती करण्यात आली आहे. निमंत्रितांव्यतिरिक्त अन्य कोणालाही सोहळयाच्या दिवशी शहरात प्रवेश नसेल. त्यामुळे त्या दिवशी फैजाबाद व अयोध्येमधील हॉटेलांची सर्व आरक्षणे रद्द करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
निमंत्रितांची व्यवस्था
निमंत्रितांच्या निवासाची विविध हॉटेल तसेच, संघ तसेच राम मंदिर आंदोलनाशी संलग्न कुटुंबांमध्ये करण्यात येणार आहे. काही अतिमहत्त्वाच्या अतिथींसाठी विशेष तंबूंचा निवारा तयार करण्यात आला आहे. एका तंबू निवाऱ्यात दोन किंवा तीन जणांना राहता येईल. सुमारे एक हजार मान्यवरांसाठी कारसेवकपूरममध्ये सुसज्ज ‘तंबूनिवारे’ उभे राहिलेले आहेत. एकाच वेळी २० हजार जणांना राहता येईल अशी ‘तंबूशहरे’ उभारली जात असल्याची माहिती सोहळयाच्या आखणीत सक्रिय असलेल्या विहिपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
मोदी, योगी, भागवत मुख्य अतिथी
प्राणप्रतिष्ठा सोहळयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व सरसंघचालक मोहन भागवत हे तिघे प्रमुख अतिथी असतील. सोहळा साडेअकरा वाजता सुरू होईल. प्राणप्रतिष्ठेनंतर या तिघांच्या भाषणानंतर सोहळयाची सांगता होईल. त्यानंतर राम मंदिर इतरांना दर्शनासाठी खुले होईल.