अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा जवळ आला आहे. जानेवारी महिन्यात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात तीन मजली राम मंदिराचा पहिला मजला पूर्ण होणार असल्याची माहिती बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
२० ते २४ जानेवारीदरम्यान प्राण-प्रतिष्ठासंबंधित कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम तारखेची माहिती येणे बाकी आहे, असे मिश्रा म्हणाले. रामनवमीच्या दिवशी गर्भगृहातील रामाच्या कपाळावर सूर्याची किरणे पडतील, असे यंत्र मंदिराच्या शिखरावर बसवण्याचे काम सुरू असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले. हे यंत्र बंगळुरूमध्ये बनवले जात असून या डिझाइनवर वैज्ञानिक देखरेख करत असल्याचेही ते म्हणाले. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी आणि पुण्यातील एका संस्थेने यासाठी एकत्रितपणे संगणकीकृत कार्यक्रम तयार केला आहे.
अभिषेक सोहळ्यानंतर मंदिर दर्शनासाठी होणार खुले?
मंदिर ट्रस्टने १४ जानेवारीला मकर संक्रांतीनंतर राम लल्लाच्या अभिषेकाची प्रक्रिया सुरू करण्याचा आणि राम लल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ हा १० दिवसांचा विधी करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येतील राम मंदिर २४ जानेवारीला राम लल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकनंतर भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे, असे ट्रस्टचे सदस्य मिश्रा यांनी जूनमध्ये सांगितले होते.
जाणकारांशी चर्चा करून प्राणप्रतिष्ठेचा विधी होणार
“डिसेंबर २०२३ पर्यंत मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन होते आणि हे काम निश्चित वेळेत पूर्ण होईल. किमान १००० वर्षे टिकेल या दृष्टीकोनातून हे मंदिर बांधले जात आहे. जाणकार संत आणि महंत यांच्याशी चर्चा करून प्राण प्रतिष्ठा विधी सुरू केला जाईल”, असेही मिश्रा म्हणाले.
ते म्हणाले की ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत नियोजित समारंभाच्या तपशीलावर काम करण्यात येत आहे.
दर्शनासाठी मिळणार १५-२० सेकंदाचा वेळ
राम मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर देशभरातील भक्तमंडळी दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अयोध्येत तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी राम मंदिर ट्रस्टकडून दर्शनाचेही नियोजन आखण्यात येत आहे. दर्शनासाठी केवळ १५-२० सेकंदाचा वेळ दिला जाईल, असं मिश्रा म्हणाले.