पीटीआय, अयोध्या
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने शुक्रवारपासून अयोध्येतील रामजन्मभूमीवरील राम मंदि रोज दुपारी एक तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून श्रीराम दुपारी तासभर विश्रांती घेतील. प्राणप्रतिष्ठा सोहळय़ानंतर मंदिरात येणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर न्यासाने दर्शनाची वेळ सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत वाढवली आहे. आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले, की श्री राम हे पाच वर्षांच्या बालक रूपात आहेत, त्यामुळे बालदेवतेला थोडी विश्रांती देण्यासाठी न्यासाने हा निर्णय घेतला आहे. या काळात मंदिराचे दरवाजे दुपारी एका तासासाठी बंद ठेवले जातील. हे मंदिर दुपारी साडेबारा ते दीडपर्यंत बंद राहील. प्राणप्रतिष्ठा सोहळय़ापूर्वी रामलल्लांच्या दर्शनाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत होती. दुपारी दीड ते साडेतीन या काळात मंदिर बंद ठेवण्यात येत असे.
आता काँग्रेसचे ‘जय सियाराम’ – मोदी
‘भगवान रामचंद्र ‘काल्पनिक’ असल्याचे जे मानायचे आणि ज्यांना राममंदिराचे बांधकाम नको होते, तेच आता ‘जय सियाराम’चा जयघोष करत आहेत,’ अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर शुक्रवारी हरियाणातील रेवाडी येथे बोलताना केली. आज संपूर्ण देश अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामलल्लांचे दर्शन घेत आहे. एवढेच काय काँग्रेसची जी मंडळी प्रभू रामाला काल्पनिक म्हणायचे, ज्यांना कधीच अयोध्येत रामाचे मंदिर बांधायचे नव्हते तेही ‘जय सियाराम’ म्हणू लागले आहेत अशी टीका त्यांनी केली.