सध्या देशभरामध्ये चर्चा आहे ती जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची. उद्या पटेल यांच्या जयंतीनिमित्त या १८२ मीटर उंच असलेल्या पुतळ्याचे लोकार्पण केले जाईल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच असणारा हा पुतळा भारताला सर्वाधिक उंचीचा पुतळा असणारा देश अशी नवी ओळख मिळवून देईल. मात्र जगभराचे लक्ष्य लागून राहिलेला आणि इतका अवाढव्य पुतळा साकारणारी व्यक्तीबद्दल खूपच कमी लोकांना ठाऊक आहे. वल्लभाई पटेल यांचा हा पुतळा साकारणारे शिल्पकार आहेत ९३ वर्षांचे राम सुतार. धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या राम सुतार यांनी अनेक प्रसिद्ध शिल्पे आपल्या हातांनी घडवली आहेत याच यादीमध्ये आता जगातील सर्वात उंच पुतळ्याचाही समावेश झाला आहे. राम सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारकशिल्पांचा इतिहास घडवणाऱ्यांपैकी एक आहेत. चला तर मग जाणून घेऊयात वयाच्या ९३ वर्षीही कार्यरत असणाऱ्या आणि २०१६ साली टागोर पुरस्कार पटकावणाऱ्या राम सुतार यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

>
१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात राम सुतार यांचा जन्म झाला.

>
त्यांनी मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.

>
तिशीच्या आतबाहेर असताना (१९५२ ते ५८) आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम त्यांनी सरकारी नोकरीत राहून केले.

>
वयाने ९३ वर्षांचे असलेल्या राम सुतार यांनी १९६० पासून स्वतंत्रपणे स्टुडिओ थाटला.

>
त्यांनी संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे अनेक पुतळे घडविले आहेत.

>
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या शिल्पांसह अनेक शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे.

>
फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्पं उभी आहेत.

>
रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकिओतील पुतळा राम सुतार यांनी निर्मिलेला आहे

>
गांधीजींचे त्यांच्या स्टुडिओत घडलेले अनेक अर्धपुतळे भारत सरकारने परदेशांना भेट म्हणून दिलेले आहेत.

>
नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे वैशिष्टय़.

>
दिल्लीत राजीव गांधी यांचे योगदान सांगणारे भित्तिशिल्प तसेच जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पिढय़ांची कारकीर्द एकत्रित मांडणारे मोठे भित्तिशिल्प राम सुतारांच्या कल्पनेतून साकारले आहे.

>
चंबळ नदीवरील गांधीसागर धरणानजीकचे ‘चंबळा आणि तिला बिलगलेली दोन बालके’ (बालके हे या धरणाचे लाभ मिळणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे प्रतीक) असे ४५ फुटी शिल्प, हा त्यांच्या कलेतील ‘भारतीयते’चा आदर्श ठरला.

>
प्रचंड आकाराची शिल्पे हे त्यांचे गेल्या कैक वर्षांपासूनचे आणखीन एक वैशिष्टय़

>
अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित आंबेडकर स्मारक आणि ३१ ऑक्टोबरला उद्घाटन होणारा चिनी बनावटीचा सरदार पटेल यांचा पुतळा ही, उंचीत एकमेकांशी स्पर्धा करणारी तिन्ही स्मारकशिल्पे राम सुतार यांच्या मूळ कल्पनेतून उतरली आहेत

>
काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

>
देशभरातील अनेक स्मारक-शिल्पकार राम सुतार यांना गुरुस्थानी मानतात.

>
गेले अर्धशतकभर दिल्लीतच राहणारे, पण मूळचे धुळे जिल्ह्य़ातले असणारे राम सुतार हे आपल्या राज्याला अभिमान वाटावा असे महाराष्ट्रपुत्र आहेत.

Story img Loader