Ramdas Athawale Funny Speech: भाषणाच्या खुमासदार शैलीसाठी ओळखले जाणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत बोलताना जोरदार फटकेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि यंदाच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. याचबरोबर आठवले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत कवितेतून राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना रामदास आठवलेंनी, “माननीय खरगेजी मत छेडो नरेंद्र मोजीदी के नैना, नही तो २०२९ मे भी हो जाएगी आपकी दैना”, असे वाक्य उच्चारताच सभागृहात एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
मत छेडो नरेंद्र मोजीदी के नैना…
राज्यसभेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भाषण केले. यावेळी आठवलेंनी अनेक मुद्दे मांडले. यावेळी नेहमीप्रमाणे त्यांनी कवितेतून विरोधकांवर टीकाही केली. ते आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले, “२०२५-२६ का ये बजेट है मोदीजी के विकास का आयना, ये सुनकर परेशान हो जायेगा चायना. माननीय खरगेजी मत छेडो नरेंद्र मोजीदी के नैना, नही तो २०२९ मे भी हो जाएगी आपकी दैना.”
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, “यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प खालच्या स्तरातील, मध्यम स्तरातील आणि उच्च स्तरातील अशा सर्व लोकांसाठी आहे. या अर्थसंकल्पातून सर्व वर्गांना न्याय देणाचा प्रयत्न करण्यात आला आहे.”
बिना मतलब मत उडाओ हमारे बजेट की खिल्ली
दरम्यान रामदास आठवले यांनी आपल्य भाषणाचा शेवटही कवितेतूनच केल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, “इस बजेट से जाग गयी है गाव गाव की गल्ली, बिना मतलब मत उडाओ हमारे बजेट की खिल्ली. बजेटसे मोदीजी की देशभर मे हो रही है बल्ली बल्ली, विरोधी दलों की तूट रही है कल्ली कल्ली.”
दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवसाचे कामकाज विविध मुद्द्यांनी गाजत आहे. आज राज्यसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा, वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवाल राज्यसभेत सादर झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. राज्यसभेत तत्पूर्वी, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी जेपीसीमध्ये विरोधी सदस्यांच्या आक्षेपांचा समावेश न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर प्रचंड गदारोळानंतर विरोधी पक्षांनी राज्यसभा सभागृहातून सभात्याग केला. यानंतर, सरकारने विरोधकांचे आरोप निराधार असल्याचे सांगत ते फेटाळून लावले आणि सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.