तृतीयपंथी व्यक्ती या स्त्री अथवा पुरूष नसतात. त्यामुळे त्यांनी साड्या नेसणे सोडून द्यावे, असे वादग्रस्त विधान करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाद ओढवून घेतला आहे. ते सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलण्याच्या नादात रामदास आठवले यांनी तृतीयपंथीयांनी साड्या नेसू नयेत, असे म्हटले. मात्र, ही चूक त्यांना लगेचच उमगली. तेव्हा हा केवळ माझा सल्ला आहे, अशी सारवासारवही त्यांनी केली. तृतीयपंथी व्यक्तींना त्यांना हवा तो पोशाख परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही आठवले यांनी सांगितले. मात्र, या शाब्दिक चुकीमुळे व्हायचा तो गोंधळ झालाच आणि सध्या आठवले यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.
रामदास आठवलेंचे सूर बदलले, गोमांस खाण्यास केला विरोध
यासंदर्भात छत्तीसगढमधील तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या विद्या राजपूत यांनी म्हटले की, तृतीयपंथी समाजाच्या हक्कांविषयी कोणाही प्रश्नचिन्ह उपस्थित करणे उचित नाही. केंद्रीय मंत्रिपदावरील व्यक्ती इतक्या बेजबाबदारपणे कशी बोलू शकते? घटनेने आम्हाला साडी नेसायचा अधिकार दिला आहे आणि तो आमचा वैयक्तिक हक्क असल्याचे विद्या राजपूत यांनी म्हटले. आठवले यांच्यासारख्या वकुबाची व्यक्ती, विशेषत: त्यांनी आता केलेले विधान पाहता त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांबद्दल न बोललेच बरे, असा टोलाही विद्या राजपूत यांनी लगावला. अशा बेजाबाबदार वक्तव्यांमुळे तृतीयपंथी समाजाला दीर्घकालीन परिणाम सोसावे लागतात, असेही राजपूत यांनी म्हटले. दरम्यान, तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीच्या ट्रान्सजेंडर विधेयकाच्या मंजूरीसाठी मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन यावेळी रामदास आठवले यांनी दिले.