रामदास आठवले यांचे आवाहन
रिपब्लिकन ऐक्य होत असेल तर नेतृत्वाच्या वादात मी पडणार नाही. रिपब्लिकन ऐक्याचे प्रमुख कोणालाही करावे; दुय्यम स्थान स्वीकारण्याची आपली तयारी आहे. सर्व गट एकत्र येऊन रिपब्लिकन ऐक्य झाले तर त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी केले तर त्यास माझा पाठिंबा राहील, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी जाहीर केले.
प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र आलो तर रिपब्लिकन ताकद वाढेल; राजकीयदृष्टय़ा समाजाचे महत्त्व वाढेल. त्यामुळे रिपब्लिकन ऐक्यासाठी मी मंत्रिपद सोडायला तयार आहे, अशी पुस्तीही आठवले यांनी जोडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रामदास आठवले यांनी रविवारी मुंबईत चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर बांद्रा येथील एमआयजी क्लबमध्ये आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रावर आधारित एकच एकीकृत रिपब्लिकन पक्ष साकार करण्याचा संकल्प आठवले यांनी केला. रिपब्लिकन ऐक्य झाल्यास युती कुणाशी करावी हे बहुमताने ठरवावे. रिपब्लिकन ऐक्यासाठी मंत्रिपद सोडायची तयारी आहे. मात्र माझे मंत्रिपद घालविण्यापेक्षा मंत्रिपदाची संख्या वाढविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.