Ramdas Athawale On US Election Results 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीकडे जगाचं लक्ष लागलं होतं. अखेर आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा मोठा विजय झाला तर विद्यमान उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा या निवडणुकीत पराभव झाला. दरम्यान, आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या चाव्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात गेल्या आहेत. आता अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मिळवलेल्या विजयाबाबत संपूर्ण देशभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भारताचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया देत त्यांचं अभिनंदन केलं आहे. मात्र, यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. ‘डोनाल्ड ट्रम्प आणि मी एकाच रिपब्लिकन पक्षाचे आहेत’, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

रामदास आठवले काय म्हणाले?

“मला वाटतं की डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे आहेत आणि माझ्या पार्टीचंही नाव रिपब्लिकन आहे. मला खूप आनंद आहे की डोनाल्ड ट्रम्प हे डॅशींग नेते आहेत. आता ते त्या ठिकाणी निवडून आले आहेत. तेथील हिंदू असो वा मुस्लिम, त्यांची मते ट्रम्प यांच्याकडे गेली आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची मते त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आल्याचा आनंद आहे. मात्र, कमला हॅरीस यांच्या पराभवामुळे दु:खीही आहे. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होत्या. त्या निवडून आल्या असत्या तर अधिक चांगलं झालं असतं. मात्र, डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी चांगले होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध चांगले आहेत”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या विजयानंतर मोदींनी केलं अभिनंदन

“निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केलीत. भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.