लैंगिक छळाचे आरोप झालेले केंद्रीय परराष्ट्र मंत्री एम.जे.अकबर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विरोधी पक्षांकडून अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.अकबर यांनी घेतलेला राजीनामा देण्याचा निर्णय योग्यच आहे. आता त्यांच्यावर झालेल्या आरोपांची योग्यरित्या चौकशी व्हावी’ असं रामदास आठवले म्हणाले आहेत.


 
यापूर्वी आज दुपारी तब्बल २० महिलांनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला. प्रिया रमाणी या महिला पत्रकारानं धाडस दाखवत ‘एशियन एज’चे संपादक असताना अकबर यांनी केलेल्या छळाचा पाढा ट्विटरवर वाचला आणि अनेक महिलांनी पुढे येत अकबर यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, अकबर विदेशातून परत आले आणि त्यांनी सगळे आरोप फेटाळत मानहानीचा दावा केला. मात्र, रमाणी यांच्या मागे तब्बल १९ महिला उभ्या राहिल्या आणि त्यांनी अकबर यांना जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार केला. याच दरम्यान, मोदी सरकारनं अशा लैंगिक छळ करणाऱ्या अतिरेक्यांना पाठिशी का घालावं असा सवाल करत काँग्रेससह विरोधकांनी भाजपाची कोंडी केली. परिणामी आधी ताठ भूमिका घेणाऱ्या अकबरना राजीनामा देणे भाग पडले.

‘ माझ्यावर झालेल्या आरोपाविरोधात मी माझी बाजू व्यक्तिगतरित्या न्यायालयात मांडणार आहे. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री या पदावरून पायउतार होणे संयुक्तिक असल्याचे मला वाटले. माझ्या करण्यात आलेल्या खोट्या आरोपांविरोधात मी आता एक व्यक्ती म्हणून लढणार आहे. याच कारणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मला देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचा आभारी आहे.’ असं आपल्या पदाचा राजीनामा देताना केलेल्या निवेदनात अकबर म्हणाले.

Story img Loader