PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024 : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने एकही जागा लढवली नव्हती. महाराष्ट्रात आठवलेंनी दोन जागांसाठी दावा केला होता. परंतु, एनडीएच्या जागावाटपात रामदास आठवलेंच्या पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. दरम्यान, लोकसभेची एकही जागा न लढवता रामदास आठवलेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. रामदास आठवले हे राज्यसभेचे खासदार आहेत.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएला स्पष्ट बहुमत असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळ बरखास्त झालं. आता नरेंद्र मोदी आज पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नवं मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. या नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान काही जुन्याच मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. तर, उर्वरित जागांवर एनडीएच्या घटकपक्षातील खासदारांना संधी दिली जाणार आहे. जुन्या मंत्र्यांमध्ये रामदास आठवलेंचाही नंबर लागतो. मंत्रिपद मिळणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा >> PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार
रामदास आठवले म्हणाले, “मला खूप आनंद आहे की नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा मला त्यांच्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे. माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे. या पक्षाने सतत १० वर्षे मोदींना समर्थन दिलं आहे. दलित जनतेला भाजपाबरोबर आणण्याचं काम माझ्या पक्षाने केलं आहे.”
“विधानसेच्या निमित्ताने महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्यासाठी मी मोदींचं समर्थन केलं आहे. मोदींच्या विकासाचं काम आम्ही जनतेसमोर आणलं आहे. तसंच संविधान बदलणार हा अपप्रचारही आम्ही रोखला आहे. काही गैरसमज होते, ते दूर केले. त्यामुळे एनडीएला बहुमत मिळालं”, असंही रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, मागच्या मंत्रिमंडळात रामदास आठवले सामाजिक कल्याण मंत्री होते. त्यामुळे यंदा त्यांना कोणत्या खात्याची अपेक्षा आहे, याबाबत विचारलं असता ते म्हणाले, “मला जे खातं दिलं जाईल ते मी सांभाळणार. “
आज सायंकाळी शपथविधी
आज सायंकाळी ७.१५ मिनिटांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. तर, ३० खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात काही जुन्या मंत्र्यांनाच संधी देण्यात आली आहे. यामध्ये नितीन गडकरी, अमित शाह, रामदास आठवलेंसह अनेक खासदारांचा समावेश आहे.