रविवारी दिल्ली गेट येथे आयोजित निषेध मोर्चाने योगगुरू बाबा रामदेव आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीनंतर उग्र रूप धारण केले, त्यामुळे त्या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराला हे दोघेच जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे वादग्रस्त नेते दिग्विजय सिंह यांनी बुधवारी येथे केला. पक्षकार्यालयात कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी ही मुक्ताफळे उधळली.
केजरीवाल आणि रामदेव बाबा मोर्चाच्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील जमावाने उग्र रूप धारण केले व तो हिंसक झाला. या वेळी झालेल्या झटापटीत सुभाष तोमर हा पोलीस कर्मचारी मारला गेला. मात्र प्रसारमाध्यमांनी याप्रकरणी एका मुलाला पुढे आणून त्यानेच तोमर यांना रुग्णालयात नेल्याचे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांवर आगपाखड करताना ते म्हणाले की या प्रकरणात प्रसारमाध्यमांनीच एफआयआर नोंदवून आरोपीही ठरवले व न्यायही दिला, असे दिसत आहे. त्या मुलीवर गुदरलेला प्रसंग हा निश्चितच निंदनीय आहे. मात्र हे कृत्य करणाऱ्या नराधमांना पोलिसांनी तीन दिवसांत अटक केली आहे ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.
या प्रकरणी मृत्युदंडाची शिक्षेची मागणी होत आहे, त्यावर बोलताना ते म्हणाले की यासंबंधातील कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने न्यायिक आयोगाची स्थापना केली आहे व हा आयोग संबंधित कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करेल, असे मला वाटते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा