पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढत होत असल्याने सर्वसामान्यांना त्याची छळ बसत आहे. फक्त गेल्या १० दिवसांत इंधनाच्या दरात नऊ वेळा वाढ झाली असून तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे. गुरुवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ करण्यात आली. दरम्यान एकीकडे सर्वसामान्य चिंतेत असताना दुसरीकडे यासंबंधी प्रश्न विचारला म्हणून योगगुरु रामदेव बाबा पत्रकारावर संतापल्याचं पहायला मिळालं.
हरियाणामधील कर्नल येथे आयोजित एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी उपस्थिती लावली. यावेळी एका पत्रकाराने लोकांनी ४० रुपये प्रतिलीटर आणि स्वयंपाकाचा गॅस ३०० रुपये सुनिश्चित करू शकणार्या सरकारचा विचार केला पाहिजे असं म्हटलं होतं याची आठवण करुन देत प्रश्न विचारला.
यावर उत्तर देताना रामदेव बाबांचा पारा चढला. “हो मी तसं म्हणालो होतो, तुम्ही काय करु शकता? मला असे प्रश्न विचारत जाऊ नका. मी तुमचा कंत्राटदार आहे का जो सतत तुमच्या प्रश्नांना उत्तर देत बसणार?,” अशी विचारणा रामदेव बाबांनी केली.
पत्रकाराने पुन्हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता रामदेव बाबा आणखी संतापले आणि त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाले, “हो मी केलं होतं वक्तव्य, तू काय करणार आहेस? शांत राहा, परत विचारलंस तर तुझ्यासाठी हे चांगलं नसेल. अशा पद्दतीन बोलू नकोस, तू एका चांगल्या आई-वडिलांचा मुलगा असावास”.
रामदेव बाबा यांनी यावेळी लोकांना कठीण वेळेत जास्त परीश्रम घ्या असा सल्ला दिला. “सरकार म्हणतं जर इंधनाचे दर कमी असतील तर त्यांना कर मिळणार नाही मग ते देश कसा चालवणार? पगार कसे देणार? रस्ते कसे बांधणार? महागाई कमी झाली पाहिजे याच्याशी मी सहमत आहे, पण लोकांनी जास्त मेहनत घेतली पाहिजे. मीदेखील पहाटे ४ वाजता उठतो आणि रात्री १० पर्यंत काम करत असतो,” असं रामदेव बाबांनी म्हणताच त्यांच्या शेजारी बसलेले समर्थक टाळ्या वाजवू लागले.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ; गेल्या १० दिवसांत साडे सहा रुपयांनी महागलं
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे.
इंधनाचे दर वाढले असल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०१ रुपये ८१ पैसे झाला आहे. याआधी हा दर १०१ रुपये १ पैसे होता. तर दुसरीकडे डिझेलचा दर प्रतिलीटर ९२ रुपये ७ पैशांवर पोहोचला आहे. याआधी हा दर ९३ रुपये ७ पैसे होता. मुंबईबद्दल बोलायचं गेल्यास ८० पैशांची वाढ झाल्यानंतर एक लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी तब्बल ११६ रुपये ७२ पैसे आणि १०० रुपये ९४ पैसे मोजावे लागणार आहेत.