२०१२ साली दिल्लीत झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून रामदेव बाबा व्यापक स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. रामदेव बाबांच्या पतंजलीची एकूण उलाढाल काही हजार कोटींमध्ये असल्याचं सांगितलं जातं. आज देशभरात लाखो लोक पतंजली आणि रामदेव बाबांचं मार्गदर्शन घेतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याशी निगडित किंवा सभोवताली येणाऱ्या अनेक गोष्टी किंवा वस्तूंपैकी अनेक वस्तूंचं उत्पादन रामदेव बाबांच्या पतंजलीमध्ये होतं. पण आता रामदेव बाबांनी एक विलक्षण आवाहन लोकांना केलं आहे. रामदेव बाबा त्यांच्या पतंजलीमध्ये आता संन्यासी बनण्याचं प्रशिक्षण देणार आहेत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबा रामदेव यांच्या आयुर्वेदिक औषध आणि उत्पादनांचा फार मोठा चाहता वर्ग आज देशात आणि काही प्रमाणात परदेशातही अस्तित्वात आहे. पण आता इच्छुक उमेदवारांना संन्यास शिकवण्याचा निर्णय रामदेव बाबांनी घेतला आहे. पतंजलीकडून त्यासंदर्भात तशी जाहिरातच प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये महिला किंवा पुरुष अशा कुणालाही संन्यासी व्हायचं असेल, तर त्याचं प्रशिक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

अट फक्त एकच…१२वी पास!

ज्यांनी कुणी संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आहे किंवा ज्यांची कुणाची इच्छा असेल, त्यांना प्रशिक्षित केलं जाईल, असं या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पण यासाठी शिक्षणाची अट मात्र घालण्यात आली आहे. कोणताही इच्छुक उमेदवार किमान १२वी पास असायला हवा, असं या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. येत्या २२ मार्चपासून ३० मार्चपर्यंत पतंजलीकडून संन्यास महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये या सर्व इच्छुकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ३० मार्चला महोत्सवाच्या शेवटी यातल्या १०० लोकांना संन्यास दीक्षा दिली जाईल. अर्थात, हे सर्व ‘संन्यासी’ म्हणून घोषित होतील!

रामदेव बाबांच्या संन्यास प्रशिक्षणाची जाहिरात! (फोटो – ट्विटर)

२०१८मध्येही रामदेव बाबांनी ९२ पुरुष आणि महिलांना दीक्षा देऊन संन्यासी घोषित केलं होतं. पतंजलीच्या हवाल्याने लल्लन टॉपन दिलेल्या वृत्तानुसार या सर्वांना रामदेव बाबांनीच संन्यासाचं प्रशिक्षण दिलं होतं. युवकांमध्ये ऋषिमुनींप्रमाणे प्रवृत्ती आणि प्रतिभा निर्माण करून भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्यात मदत करणं, हा त्यातला हेतू असल्याचं पतंजलीकडून जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केलं आहे.

संन्यासाशिवाय इतरही विषयांचं प्रशिक्षण!

दरम्यान, इथे संन्यासी म्हणून दीक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्शनशास्त्र, व्याकरण, वेदशास्त्र आणि संस्कृत साहित्य, बीए-एमए अशा विविध प्रकारचं शिक्षणही घेता येऊ शकणार आहे. लल्लनटॉपच्या याच वृत्तानुसार पतंजलीमध्ये १२वी पास व्यक्तीला संन्यासी होण्यासाठी साधारण तीन ते चार वर्षं लागतील. पण जर एखादी व्यक्ती पदवीधर असेल, तर पुढच्या दोन वर्षांमध्ये ते संन्यासी होतात. त्यासाठी हरिद्वारमधल्या संन्यास आश्रममध्ये या व्यक्तीने प्रवेश घेतल्यापासून त्याचा जेवणाचा, राहण्याचा, शिक्षणाचा सर्व खर्च पतंजलीकडून केला जातो. पण त्या व्यक्तीने संन्याशाप्रमाणे आपलं राहणीमान ठेवायला हवं आणि संन्यासी होण्याचं त्यानं मनाशी निश्चित केलेलं असावं. या ठिकाणी संबंधित व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारची कामंही दिली जातात. गोसेवा किंवा पतंजलीशी संबंधित वेगवेगळ्या कामांचा यात समावेश आहे.