नवी दिल्ली : सव्वातीन वर्षांची वादग्रस्त कारकीर्द असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा केंद्र सरकारने रविवारी मंजूर केला. आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांची झारखंडमधील कारकीर्दही कोश्यारींइतकीच वादग्रस्त आहे.
महाराष्ट्रासह १२ राज्यांत तसेच, लडाख या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी नव्या राज्यपालांची नियुक्ती केली. विविध राज्यांमधील राजकीय परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी तसेच, आगामी विधानसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे मानले जाते.
महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल कोश्यारी यांची एकंदर कारकीर्द वादग्रस्त होती. राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावे, अशी घटनेत तरतूद असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोश्यारी यांनी सरकारची अडवणूक केल्याचे म्हटले जाते. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीस नकार देणे, त्यानंतर १२ सदस्यांची नियुक्ती अडीच वर्षे प्रलंबित ठेवणे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे आदी कारणांमुळे कोश्यारी वादग्रस्त ठरले.
नझीर यांची नियुक्ती आश्चर्यकारकसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी झालेली नियुक्ती भुवया उंचावणारी ठरली आहे. निवृत्तीनंतर अवघ्या महिन्यांत न्यायमूर्ती नाझीर यांना केंद्र सरकारने राज्यपाल केले आहे. एकमताने राम मंदिराचा ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातील सदस्यांमध्ये न्या. नाझीर हे एकमेव मुस्लिम होते. २०१६ मधील नोटबंदीच्या निर्णयाची केंद्राची प्रक्रिया योग्य असल्याचा निर्वाळा देणाऱ्या घटनापीठातही ते होते. तिहेरी तलाक, लोकप्रतिनिधींचे स्वातंत्र्य, गोपनीयतेचा हक्क अशा अनेक महत्त्वाच्या निकालांमध्ये त्यांचा समावेश होता.
राजस्थानची आगामी विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील भाजपचे मेवाड प्रांतातील बलाढय़ नेते गुलाबचंद कटारिया यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राजकीय निवृत्ती घेणे भाग पाडले आहे. कटारिया यांची थेट आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर जिल्ह्यातील बलाढय़ ब्राह्मण नेते शिवप्रताप शुक्ला यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करून त्यांचे अप्रत्यक्ष पुनर्वसन केले आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी पुन्हा न देण्याचा निर्णय मोदी-शहांनी घेतला होता.
संघाच्या मुशीतून वैचारिक आणि राजकीय घडणघडण झालेले, वाराणसीतील मोदी समर्थक लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना निष्ठेचे फळ मिळाले असून त्यांना सिक्कीमचे राज्यपाल करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना आता भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा बिहारचे राज्यपालपद देण्यात आले आहे. छत्तीसगढच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची बदली मणिपूरच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी संभाव्य नावांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती.
तमीळनाडूतील दोन बडय़ा भाजप नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून सी. पी. राधाकृष्णन हे हिंदूी पट्टय़ातील झारखंडचे नवे राज्यपाल झाले आहेत. तर, मणिपूरचे राज्यपाल ला. गणेशन यांना नागालँडच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नागालँडमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे.
मेघालयमध्ये येत्या १५ दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून तेथे फागू चौहान यांची राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. चौहान यांना बिहारमधून मेघालयमध्ये पाठवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांना आता छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहेत. निवृत्त ब्रिगेडीअर बी. डी. मिश्रा या आता लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपाल असतील, तर लेफ्ट. जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक (निवृत्त) अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असतील.
नव्या राज्यपालांची कारकीर्द
बैस यांची झारखंडमधील कारकीर्दही वादग्रस्तच आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारच्या अनेक निर्णयांवर त्यांनी आक्षेप घेतला होता. लाभाच्या पदाच्या वादावरून सोरेन यांना अपात्र ठरवण्याच्या मुद्यावर बैस यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सल्ला मागितला होता. त्यावरूनही सोरेन आणि बैस यांच्यामध्ये संघर्ष झाला होता.
नव्या नियुक्त्या
लेफ्ट. जनरल (निवृत्त) कैवल्य त्रिविक्रम
परनाईक : अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य : सिक्कीम
सी. पी. राधाकृष्णन : झारखंड
शिवप्रताप शुक्ला : हिमाचल प्रदेश
गुलाबचंद कटारिया : आसाम
न्या. एस. अब्दुल नझीर : आंध्र प्रदेश
बदल्या..
विश्वभूषण हरिचंदन : आंध्र प्रदेशातून छत्तीसगढमध्ये
अनुसईया उईके : छत्तीसगढहून मणिपूरला
ला. गणेशन : मणिपूरहून नागालँडला
फागू चौहान : बिहारहून मेघालयमध्ये
राजेंद्र अर्लेकर : हिमाचल प्रदेशहून बिहारमध्ये
रमेश बैस : झारखंडहून महाराष्ट्रात
बी. डी. मिश्रा : आंध्रप्रदेशहून लडाखमध्ये