वन रँक वन पेन्शनच्या मागणीसाठी आत्महत्या करणारे रामकिशन गढेवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते असे वादग्रस्त विधान केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी केले आहे. रामकिशन यांचा वाद बँकेसोबत होता, त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही असेही ते म्हणालेत.
वन रँक वन पेन्शनच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे रामकिशन गढेवाल या माजी सैनिकाने आत्महत्या केली होती. गढेवाल यांच्या आत्महत्येवरुन व्ही के सिंह यांनी गुरुवारी भाष्य केले. गढेवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सरपंचपदाची निवडणूकही लढवली होती असा दावाच त्यांनी केला. गढेवाल यांनी सल्फा टॅबलेट्स घेतल्या होत्या. त्यांना या गोळ्या कशा मिळाल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रामकिशन यांची आत्महत्या दुर्दैवी घटना आहे. त्यांनी वन रँक वन पेन्शनसंदर्भात आमच्याकडे दाद मागितली असती आणि आम्ही त्यावर दिरंगाई दाखवली असती तर ती आमची चूक ठरली असती असेही त्यांनी स्पष्ट केले. रामकिशन यांच्या मृत्यूवर अन्य भाजप नेत्यांची जीभही घसरली आहे. सीमेवर लढताना मृत्यू झालेल्यांना शहीद म्हणतात, आत्महत्या करणा-यांना शहीद म्हणत नाही असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे. रामकिशन यांना वन रँक वन पेन्शनचा लाभ मिळत होता. तरीदेखील त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास झाला पाहिजे असे भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या कृत्यावरुन ते कॉमेडी सर्कसमध्ये आल्याचे वाटते अशी वादग्रस्त टीकाही त्यांनी केली.
रामकिशन गढेवाल यांच्या आत्महत्येवरुन व्ही के सिंह यांनी गुरुवारीदेखील वादग्रस्त विधान केले होते. या सैनिकाने आत्महत्या केली. त्याचे कारण कुणालाही माहित नाही. मात्र, त्यासाठी वन रँक वन पेन्शनचे कारण जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्या करताना त्यांच्या मनात काय सुरू होते, हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली पाहिजे असे व्ही के सिंह यांनी म्हटले होते.
He was a Congress worker and who fought Sarpanch election on Congress ticket. His suicide is unfortunate: VK Singh on Ex-serviceman suicide pic.twitter.com/vMFCvDQGHN
— ANI (@ANI) November 3, 2016