पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांचा रामनाथ गोएंका पुरस्काराने गौरव केला जातो. हे पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत मानाचे पुरस्कार मानले जातात. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पुरस्काराच्या मानकऱ्यांचा गौरव केला जातो आहे. हा सोहळा दिल्लीमध्ये रंगला आहे. १८ विभागातील २९ पत्रकारांचा गौरव रामनाथ गोएंका पुरस्काराने केला जातो आहे. ज्यामध्ये प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियातील पत्रकारांचा समावेश आहे. लोकसत्ताचे संदीप आचार्य आणि निशांत सरवणकर यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या दोघांनीही विश्वास पाटील यांच्याबाबत जी वृत्तमालिका राबवली त्याच योगदानाचा गौरव करण्यात आला.

विश्वास पाटील यांच्या फायली निकाली काढण्याच्या गतिमानतेचे वृत्त ३ व ४ जुलै २०१७ रोजी सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. नवे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि या प्रकरणी चौकशी सुरू केली.  याच संदर्भातल्या बातम्यांची जी मालिका संदीप आचार्य आणि निशांत सरवणकर या दोघांनी राबवली त्याचमुळे त्यांच्या कार्याचा गौरव रामनाथ गोएंका पुरस्काराने करण्यात आला.

या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पत्रकारितेचे समाजाशी असलेले नाते हे विश्वासाचे नाते आहे. विश्वास कधीही एक दोन दिवसात बसत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. रामनाथ गोएंका यांनी सत्याची कास कधीही सोडली नाही. सत्तेची, यंत्रणेची पर्वा न करता ते सच्ची पत्रकारिता करत होते त्याचमुळे ते आपल्या सगळ्यांच्या मनामनात जिवंत आहेत असेही सिंह यांनी म्हटलं आहे. ज्यांना सच्ची पत्रकारिता करायची आहे त्यांनी रामनाथ गोएंका यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असेही सिंह यांनी म्हटलं आहे.

रामनाथ गोएंका यांनी  समाजात निर्माण केलेला विश्वास अढळ आहे. त्यांनी हा विश्वास मिळवण्यासाठी अपार कष्ट घेतले. आपले तत्त्व आणि खरं बोलणं गोएंका यांनी कधीही सोडलं नाही. इंग्रजांशी दिलेला लढा असो, आणीबाणी असो किंवा कोणताही प्रसंग असो रामनाथ गोएंका कधीही डगमगले नाहीत. अशाच रामनाथ गोएंका यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार ही खरोखरच गौरवाची बाब आहे असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी रामनाथ गोएंका यांनी लिहिलेल्या अग्रलेखाच्या काही ओळीही वाचून दाखवल्या.

Story img Loader